Monday, 4 September 2017

Quote-Unquote@05.09.17 (Last Article)

   आधुनिक यंत्रजीवन                    

 “What shall I do now? What shall I do?”

“I shall rush out as I am, and walk the street

“With my hair down, so. What shall we do tomorrow? 

“What shall we ever do?” 

The hot water at ten. 

And if it rains, a closed car at four. 

And we shall play a game of chess,

       Pressing lidless eyes and waiting for a knock upon the door.                                               -T.S.Eliot/The waste land

इंग्रजी वाड़मयातील २० वे शतक म्हणजे आधुनिक कालखंड मानला जातो या आधुनिक कालखंडातील साहित्याचा इतिहास ज्या महान कवीच्या काव्याशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही तो कवी म्हणजे टी.एस. एलीयट आणि त्याचे सबंध जगभरात प्रसिद्ध झालेले काव्य म्हणजे वेस्ट लँड ही कविता. भौतिकवाद प्रारंभ होऊन बरीच वर्षे उलटल्यावर त्याचा मानवी जीवनावर होणारा विपरीत परीणाम ठसठशीतपणे मांडणारी ही कविता म्हणजे काव्य क्षेत्रातील एक क्रांतीच होती. परंपरांना चिकटून आपले पारंपारिक वैभव जगासमोर दिमाखाने मांडणाऱ्या पाश्चात्य संकल्पनांना संपुर्णपणे उधळून भोगवादाने ढवळून निधालेला मानवी सभ्यतेचा ऱ्हास झालेला आधुनिक समाज जेव्हा एलीयटने आपल्या कवितेमधून मांडला तेव्हा समाजमन सुन्न झाले धर्मसंस्था देखील हादरुन गेल्या. खरे सांगायचे झाल्यास एलीयटच्या या कवितेने पारंपारिकतेचा बुरखा टराटरा फाडून भौतिक सुखांच्या आहारी जाऊन माणूसपणाचे सत्व गमावलेली स्थिती जेव्हा मांडली तेव्हा संवेदनशील मन असलेला प्रत्येक माणूस हादरुन गेला. साधारण शंभर वर्षांनंतर जेव्हा आपण ही कविता आता एकविसाव्या शतकात आपल्या देशातील बदलत्या संकल्पनांच्या पार्श्वभूमीवर वाचू लागतो तेव्हा तंत्रज्ञान सुधारणा अंगीकारुन भौतिकतेच्या विळख्यात आपण देखील अडकच चाललोय आणि एलीयटने व्यक्त केलेली मानवी यंत्रावस्था आपल्याही वाट्याला येईल का अशी भिती वाटू लागते. आपल्याही देशात समाजाला वेगवेगळ्या परंपरांनी धर्मसंस्थांनी बांधून ठेवले आहे. परंतू या तंत्रज्ञानाच्या भस्मासुरामुळे अस्सल माणूसपण हरवून आपण सारे जवळपास यंत्रवत जगू लागलो की काय असे कधीतरी वाटून जाते. धर्मसंस्थांशी निगडीत लोकांचे व्यभिचार उघड होतात त्यामुळे देखील आस्थांच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह लागते. अश्यावेळी एलीयटने वरील ओळींमधे वर्णन केलेली टोकाच्या एकटेपणाची भावना आपल्यालाही लवकरच अनुभवायला लागू शकते अशी शंका निर्माण होते. आधुनिक काळातील तंत्रज्ञानाच्या अती वापरामुळे आपल्याला भोगावा लागणारा एक महत्वाचा शाप म्हणजे आपले प्रत्यक्ष माणसा माणसातील संवादाकडून तंत्रज्ञानाच्या आधारे साधल्या जाणाऱ्या आभासी संवाद व्यवस्थेकडे झपाट्याने जाणे.

तंत्रज्ञानाचा शिरकाव आपल्या जगात झाला स्वाभाविकपणे त्याचा वापर मर्यादित स्वरुपात करणे हे मात्र आपल्या हातात राहीले नाही. वेगवेगळ्या माध्यमातून आपण आता एकाचवेळी अनेकांशी संवाद साधण्याचे कौशल्य प्राप्त केले आहे. मर्यादित स्वरुपात ते ठीकही आहे. परंतू या संवादांमुळे एकमेकांना प्रत्यक्ष भेटून साधला जाणारा संवाद जवळपास बंद झालाय आणि उरलाय तो सोशल मिडीयामधील संपुर्णपणे आभासी संवाद ज्यात औपचारिकता जास्त उपयोगीता फारच कमी अशी स्थिती बनत जाते आहे. परंतू हे सारे घडत असताना आता या तंत्रज्ञानाच्या आभासी मायाजालाची उलट गिनती सुरु होतेय आणि म्हणूनच या काळात एलीयटची कविता आपल्याला या तंत्रज्ञानामधून निर्माण होणाऱ्या एकाकीपणावरचा मार्ग सुचवितो आहे. हे एकाकीपण किती भयावह असते त्यामधून जीवन रसहीन होऊन केवळ उपचारापुरते उरते हेच या वरील ओळीत एलीयटने मांडले आहे

मी आता काय करावे? आपण उद्या काय करणार? काय करणार उद्या आपण? आपण काय करत असतो? दहा वाजता गरम पाण्याची आंघोळ आणि पाऊस आला तर चार वाजता बंद काचांची कारपापण्याही लवता बंद दरवाज्यावर कुणाच्या येण्याची पडणारी थापवाट बघायचीहे सारे वर्णन कशाचे द्योतक आहे? ही आहे एकटेपणाच्या भावनेतून निर्माण झालेली असुरक्षितता आणि यांत्रिक जीवनातील तोच तोचपणा मुळे निर्माण झालेला कंटाळा. जीवन रसहीन होऊन जगण्याचा आनंद संपण्याचा भयानक शाप आधुनिक काळात माणसाच्या जीवनाला लागतो. एलीयटने केलेले वर्णन आपल्याला काहीसे अतिशयोक्तीपूर्ण वाटत असले तरी आपण सारेच हळूहळू त्याच दिशेने सरकत आहोत हे मात्र खरे आहे. त्यामुळे एलीयटची ही कविता आपल्यासाठी धोक्याची घंटा म्हणून उपयुक्त ठरु शकते.

आपणही तंत्रज्ञानाच्या आधारे निर्माण होत असलेल्या आभासी जगाचे भागीदार बनून संवादहीनतेच्या विश्वाकडे वाटचाल करतोच आहोत. अनेक लोकांशी एकाचवेळी संवाद साधण्यासाठी किंवा उपयुक्त माहिती संक्रमित करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मर्यादित स्वरुपाचा वापर फायद्याचा देखील ठरतो परंतू केवळ तीच एक बाब महत्वाची ठरुन प्रत्यक्ष संवाद किंवा सहवास या बाबी दुरापास्त होऊ लागल्या आहेत. तंत्रज्ञानासोबतच संपुर्णपणे बदलून गेलेली जीवनशैली, कार्यक्षेत्री निर्माण होत असलेले तणाव, या तणावाचे संयोजन करण्यासाठी सहजच स्विकारल्या जाणारी व्यसनाधीनता, त्या व्यसनांमुळे स्वास्थ्यावर होणारे दुष्परीणाम त्यामुळे अंतिमतः निर्माण होणारी विस्कळीत जीवन प्रणाली अश्या विषचक्रात अडकलेले अनेक लोक टी.एस. एलीयटच्या वेस्ट लँडच्या दिशेनेच मार्गक्रमण करीत आहेत. याउलट आपल्या पुरातन समाजस्थितीमधे परस्पर संबंध आणि सहसंवाद हाच जगण्याचा मुलाधार होता त्यामुळे जीवन भौतिकदृष्ट्या फार सुखकर नसले तरी आनंदी होते. तो आनंद आता हरवत चालला आहे आणि म्हणूनच एलीयटने वर्णन केलेला आयुष्यातील पोकळपणा कायम स्मरणात ठेवायला हवा आपण सर्वांनी एकत्रीतपणे आपल्या आयुष्यात तो येऊ नये यासाठी प्रयत्नरत असायला हवे. असे झाल्यास आपला देश हा पूर्वीप्रमाणे इस्टलँड बनूनच राहील. याचे कारण या देशाचे येथील सामाजिक विचारप्रक्रीयेचे कौतुक खुद्द एलीयटला देखील होते. म्हणूनच आधुनिक काळात निर्माण झालेल्या भयावह यांत्रिक जीवन पद्धतीमुळे माणूसपण हरविलेल्या पाश्चिमात्य जीवनपद्धतीला बदलवायचे असल्यास भारत देशात अस्तित्वात असलेली जीवनशैली आध्यात्मिक विचारशैली अनुसरावी असेच त्याने याच कवितेच्या शेवटी सुचविले आहे. म्हणूनच पाश्चिमात्य माणसाच्या जीवनात भौतिकवादामुळे निर्माण होणाऱ्या फोलपणाला सकारात्मकतेमधे बदलविण्यासाठी उपाययोजना सांगताना एलीयटने ही जगविख्यात कविता ओम शांती शांती शांती या वचनाने संपविली आहे. भारतीय आध्यात्मिक विचारप्रक्रीयेचे महत्व एलीयटला २० व्या शतकाच्या सुरुवातीलाच पटले होतेआपल्याला ते निदान २१ व्या शतकाच्या सुरुवातीला तर पटायला हवे. होय ना?


वाचक स्नेही मंडळींचे धन्यवाद!

वाचक स्नेही मंडळीया सदराच्या मालिकेतील आजचा हा शेवटचा भाग मी सादर केला.

 इंग्रजी साहित्याच्या अभ्यासकांनी तसेच अनेक वाचकांनी या सदराला देखील भरभरुन प्रतिसाद दिला याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.

दैहिंदुस्थान परीवारातील माझा जीवलग मित्र विलास मराठेसौमनिषावहिनी मराठेविनोददादा मराठे 

तसेच सर्व बंधू-भगिनी यांचे मला सहकार्य लाभले  त्यामुळेच हे देखील सदर लोकप्रीय झाले.

 हे सदर थांबत असले तरी देखील आपल्या आशिर्वादानेपाठबळाने  प्रोत्साहनाने 

माझ्या लेखणीचा प्रवास सुरुच राहणार आहे

पुढील मंगळवारी पुन्हा भेटुया… माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक वाचकांच्या खूप आग्रहास्तव… 

नव्याने….पुन्हा एकदा…. थोडा हैथोडे की जरुरत है या सदराच्या नव्या प्रवासासह!! 

डॉअविनाश भास्कर मोहरील /  ९४२३१२३९०६


Quote-Unquote@05.09.17 (Last Article)

   आधुनिक यंत्रजीवन                      “What shall I do now? What shall I do?” “I shall rush out as I am, and walk the street “With m...