Monday, 3 July 2017

Quote-Unquote 04.07.17

 विलक्षण सकारात्मकता                       

    If winter comes, can spring be far behind?

                             -P. B. Shelley

एखाद्या कवितेची केवळ एक ओळ देखील आपल्याला जीवनातील सकारात्मकतेचा अतिशय मोठा पाठ शिकवू शकते यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. परंतू लेखकांच्या किंवा कवींच्या समृद्ध लेखणीत प्रचंड उर्जा असते जी शब्दांच्या रुपाने आपल्याला प्रकाशमान करुन टाकते. एखाद्या कवितेतील एखादी ओळ एखाद्या विद्युल्लतेसारखी चमकते तिच्या तेजस्वी विचार प्रकाशाने अवघे आयुष्य उजळून जाईल अश्या प्रकारचे आश्चर्य घडते. इंग्रजी वाड़मयात अतिशय श्रेष्ठ दर्जाचा असलेला परंतू दुर्दैवाने हयातीत प्रसिद्ध होऊ शकलेला एक रोमँटीक कवी होऊन गेला. पी.बी. शेले. अतिशय दर्जेदार विचारप्रवर्तक काव्यलेखन केल्यानंतरही त्या काळी त्याच्या कवितांना समाजमान्यता प्राप्त होऊ शकली नाही. त्याहुन महत्वाचे म्हणजे त्याच्या काव्याची असामान्य प्रतिभा त्याला स्वतःला जाणविली होती त्यामुळे त्याचे मन जास्त विदीर्ण होत होते. या दुःखी भावनेतूनच त्याने Ode to the west wind नावाची कविता लिहीली. भुमध्य समुद्रावर खळबळ माजविणाऱ्या वेगवान वाऱ्याला उद्देशून सदर कविता शेलेने रचली. यामधे हा वेगवान वारा करीत असलेली अनेक अभुतपूर्व कामे त्याने वर्णिली आहेत. ती सर्व कामे या वाऱ्यासारख्या केवळ अतीमानवीय शक्तीच करु शकतात त्यामुळे त्या वाऱ्याची शक्ती शेले चाणाक्ष बुद्धीमत्तेने आपल्या जवळपास मृतप्राय झालेल्या विचारांना परत एकदा नव्याने समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी वापरण्याची इच्छा प्रकट करतो आहे. योग्यता असताना देखील समाजाकडून दुर्लक्षित राहील्याचे शल्य त्याच्या मनाला बोचल्याने तो खिन्न झालाय. विषण्ण मनाने तो त्याच्या मनाची उपेक्षिताची वेदना मोठ्या तीव्रतेने मांडतो. परंतू हे सारे करत असतानाही कवितेच्या शेवटी मात्र तो स्वतःलाच नव्हे तर या श्रेष्ठ दर्जाच्या कवितेच्या माध्यमातून सबंध समाजालाही विलक्षण सकारात्मकतेचा संदेश देतो. स्वतः संपुर्णपणे खचून गेल्यावरही त्याचा आशावाद संपत नाही. समाजाकडून मिळालेल्या उपेक्षेमुळे तो अक्षरशः रक्तबंबाळ झाला असे तो या कवितेत लिहीतो. परंतू वेदनेने मन पिळवटून निघाल्यावरही तो त्याचा आशावाद सोडत नाही. हा विलक्षण आशावाद Ode to the west wind या कवितेतील शेवटच्या कमालीच्या प्रभावी ओळीतून दिसून येतो. If winter comes, can spring be far behind? ही ती ओळ शेलेच्या सकारात्मकतेचे अद्भुत प्रतिक बनलेली आहे. त्याच्या जीवनातील त्या तीव्र वेदना, उपेक्षा योग्यता असूनही पदरी आलेली अवहेलना या सर्वांना प्रतिकात्मक पद्धतीने त्याने हिव्याळ्याच्या ऋतुची उपमा दिली आहे. थंडीने गारठवून टाकणारा युरोपातील हिवाळा म्हणजे त्रास वेदनाच असते. परंतू  या हिवाळ्याच्या प्रचंड गारठ्याचा सामना प्रत्येकाने करायलाच हवा कारण हा हिवाळा आला म्हणजे त्यानंतर वसंत ऋतू येणारच आहे याची खात्री असते. आनंद समाधान देणारा वसंत ऋतु म्हणजे शेलेच्या जीवनातील सुवर्णकाळ ज्यामधे त्याचे विचार समाजात स्विकारले जातील त्याच्या काव्यप्रतिभेचा सन्मान केल्या जाईल. उपेक्षा अपमानाने भरलेला हिवाळा आलाय परंतू त्यामुळे मी कोलमडून जाणार नाही तर सन्मानाने भरलेला वसंत ऋतू आता येणारच आहे या आशावादावर मी या बोचऱ्या हिवाळ्याचा सामना करेन. जीवनात अपेक्षाभंगाचे इतके मोठे दुःख भोगल्यानंतरही शेले सारखा श्रेष्ठ कवी समाजाला सकारात्मकताच शिकवितो..हीच त्याच्या काव्यप्रतिभेची कमाल आहे हाच त्याच्या कवित्वाचा विजय देखील आहे. समाजाने या महान कवीला त्याच्या मृत्यू पश्चातच स्विकारले. परंतू विलक्षण आशावादाचा हा धनी आज तीन शतकांनंतरही आपल्याला प्रेरणा देतो..हा त्याच्या आपल्याही आयुष्यातील वसंत ऋतुच नाही का?

त्यावर्षीचा पावसाळा फार उग्र होता. त्या दिवशी पावसाचा जोर वाढु लागला होता यावेळचा पाऊस काही वेगळाच आहे असे सर्वांनाच जाणवू लागले होते. अमरावतीच्या पन्नालाल नगरातून वाहणारा नाला दुथडी भरुन वाहत होता. पाणी नाल्याच्या सिमा पार करुन वाहत होते. नेहमीप्रमाणे या नाल्याची खोली वाढविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करायचे राहून गेले होते. या नाल्याच्या काठी माझ्या गिरीश नावाच्या मित्राचे घर होते. पाणी खूप वाढू लागले आणि अचानक गिरीश च्या घराला धोका निर्माण झाला. नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता संपली त्याचे पाणी नाल्यालगतच्या गल्लीतून वाहणे सुरु झाले. त्या गल्लीच्या सरळ तोंडावर गिरीशचे घर होते. पाणी आता थेट गिरीशच्या घराला भेदून वाहू लागले. मोठा धोका होऊ शकतो या अंदाजाने गिरीशच्या वडीलांनी त्याच्या दोन भावंडांना आईला घरातून बाहेर पडण्यास सांगितले. रात्रीचे वाजले होते. पाण्याचा वाढता वेग बघून त्यांनी केवळ दहा मिनीटाचा वेळ दिला. तेवढ्या वेळात गिरीशच्या आईने एका बोचक्यात केवळ देवघरातील देव बांधले आणि ते कुटुंब घराबाहेर पडले. घरालगतच्या एका उंच दुकानाच्या पायरीवर ते सारे आम्ही काहीजण जाऊन बसलो. पाणी आणखी वाढले आता ते गिरीशच्या घरातून वाहू लागले. बघता बघता पाण्याचा जोर फारच वाढला घराची समोरची भिंत कोसळली. हतबल होऊन आपले कष्टाने बांधलेले घर असे हळूहळू पडताना बघण्याशिवाय त्या कुटुंबाकडे काहीही पर्याय नव्हतासाधारण अर्धा तासाने दुसरी भिंत कोसळली..मी गिरीशच्या वडीलांजवळ बसलो होतो. शिक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या काकांनी त्या घराची एकुणएक वीट कष्टाच्या प्रामाणिकतेने मिळविलेल्या पैश्यातून बांधली होती. भिंत कोसळताना त्यांनी केवळ डोळ्यांनीच काकुंना आधार दिला कारण काकुंच्या डोळ्याला तर अश्रूंची धार लागली होती. सपाट्याने पडणाऱ्या पावसापेक्षाही तीव्र होती ती….त्या घरासाठी काकांनी केलेले प्रयत्न, बांधकामासाठी उभा केलेला पैसा, त्यासाठी अनेक गोष्टींचा केलेला त्याग या साऱ्या गोष्टी त्यांना आठवत होत्या. घरावर स्लॅब टाकण्याच्या वेळी अचानक अपेक्षित असलेले कर्ज मिळू शकले नव्हते. जवळपास महिनाभर काम बंद पडले होते. त्यावेळी काळ्या मण्याची एक छोटीशी पोत गळ्यात ठेऊन काकुंनी अंगावरचे सगळे दागिने घरासाठी विकून टाकले होते. त्यांच्या दागिन्यांना विकून पैसा उभा झाला त्यानंतर घराची स्लॅब झाली….हे सारे काका मला सांगत होते….तेवढ्यात धाडकन् मोठ्ठा आवाज झाला आणि दोन्ही भिंतींचा आधार गेल्याने त्या घराची स्लॅब कोसळली….गिरीशचे घर जमीनदोस्त झाले. रात्रीच्या अंधारात चेहेऱ्यावर पाऊस पडत असल्याने त्या कुटुंबातील कुणाच्याही डोळ्यातून वाहणारे अश्रु कुणालाच फारसे दिसले नाही….पाऊस बरसतच राहीला. घर जमीनदोस्त झाल्यावर त्याकडे काकांनी एकदा मन भरुन बघितले त्यानंतर काका म्हणालेआता पाऊस पडून गेलाकरायचे ते नुकसान करुन गेलाचलाआता उजाडल्याशिवाय राहणार नाहीइतक्या पावसानंतर आकाश मोकळे झाल्याशिवाय राहणार नाहीचला

आपल्या कुटुंबाला घेऊन ते नातेवाईकांकडे नंतर भाड्याच्या घरात रहायला गेले. प्रसंग घडून गेला. जीवन पुन्हा सुरु झाले. परंतू काकांचे ते वाक्य माझ्या मनात घर करुन राहीले होते. ते काहीतरी वेगळे होतेखूप वेगळेसर्वांना आधार देणारे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुःख विसरून पुढे मार्गक्रमण करायला लावणारे होतेत्याचा अचूक अर्थ त्यावेळी कळला नव्हता..परंतू शेलेच्या या प्रभावी ओळीने त्या वाक्यामधील विलक्षण सकारात्मकता मनाला भिडलीअनेक वर्षांनंतर काकांनी दाखविलेली सकारात्मकता शेलेने उलगडून दाखविली….आपल्याही जीवनात आलेल्या वेदना, उपेक्षा, दुःख या निराश करुन टाकणाऱ्या हिवाळारुपी गोष्टींनी हरुन जाता त्यानंतर येणाऱ्या आनंददायी वसंत ऋतूच्या आगमनावर विश्वास ठेऊन जगुयामनापासून जगुया!!

 

No comments:

Post a Comment

Quote-Unquote@05.09.17 (Last Article)

   आधुनिक यंत्रजीवन                      “What shall I do now? What shall I do?” “I shall rush out as I am, and walk the street “With m...