Heard melodies are sweet, but those unheard
Are sweeter; therefore, ye soft pipes, play on;
Not to the sensual ear, but, more endear'd,
Pipe to the spirit ditties of no tone:
-John Keats
इंग्रजी वाड़मयातील रोमॅन्टीसीझम या साहित्यीक चळवळीच्या अग्रणी कवींमधे जॉन कीट्स या कवीचे नाव घेतले जाते. मानवी भावनांना समजून त्या भावनिक पातळीवर सौंदर्याभिमुख करुन सादर करणे हे त्याचे वैशिष्ट्य होय. कल्पनाविलास हा देखील किट्सच्या कवितांचा आधार आहे. परंतू कल्पना विलास करताना मानवी मनाची काही मूलभूत तत्वे कवितांमधून मांडण्याचा त्याचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. रोमॅन्टीसिझम मधील साऱ्या वैशिष्ट्यांसोबत किट्सच्या कवितांमधे आणखी एक वैशिष्ट्य बघायला मिळते…ते म्हणजे त्याचे ग्रीक संस्कृतीवरील प्रेम. ग्रीकांकडे असणारी सौंदर्यबुद्धी व कलात्मकता किट्सला कायम मोहवत आलेली आहे. कलेतील अद्वैताचा शोध हा निरंतर असतो व माणसाने आरंभलेल्या या शोधाच्या प्रक्रीयेलाच विकासात्मक जीवनाचे टप्पे म्हणता येईल असा मोठा आशय व्यक्त करणाऱ्या या वरील ओळी जॉन किट्सच्या Ode on a Gracian Urn नावाच्या कवितेतील आहेत. एका मोठ्या ग्रीक हस्तशिल्पावरील रेखाटलेली सुंदर चित्रे बघून सत्य आणि सुंदर याची सांगड घालण्याचा प्रयत्न या कवितेत किट्सने केलाय. एका जंगलामधे आपल्या पाव्यावर सुरेल गीत वाजविणारा एक तरुण त्या मोठ्या रांजणावर चितारलेला आहे. त्याच्या त्या पाव्यातून निघणाऱ्या सुरांबद्दल कल्पाना विलास करताना किट्स म्हणतो की ऐकलेली गाणी तर सुंदर असतातच परंतू न ऐकलेली गाणी जास्त सुंदर असतात. म्हणूनच विविध इंद्रीयांच्या समुच्चयाने बनलेल्या माणसाच्या शरीरातील संगीत ऐकणाऱ्या कानांसाठी नाही तर या समस्त जगाचे संचालन करणाऱ्या अज्ञात व अव्यक्त देवतांसाठी तू संगीत निर्माण कर अशी सूचना कवी त्या बासरी वादकाला करतो आहे. पाव्यावर वाजणारे गीत जर आपण ऐकले तर ते आपल्याला सुमधुरच वाटेल परंतू ते कळल्यामुळे त्याची शाश्वतता संपुष्टात येते आणि मग पुढे नव्याने ते चित्र बघणाऱ्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या कल्पना विलासाकरीता संधी उपलब्ध होत नाही. तेच ते गीत अव्यक्त असेल तर प्रत्येकाला आपापल्या विचारक्षमतेनुसार व कल्पनाशक्तीनुसार त्याच्या त्याच्या मनातील सर्वोत्तम गीत त्या पाव्यातून ऐकता येऊ शकते. इंद्रीयांच्या पलीकडच्या अतिन्द्रीयांच्या सहाय्याने त्या गाण्याचे नाविण्य कायम टिकू शकते कारण त्याची सुंदरता ही शाश्वत व सत्य बनते. ही एक प्रकारची अपूर्णताच प्रत्येक संवेदनशील माणसाला आपल्या मनातील सर्वोत्तम सुंदर गीत त्या पाव्यातून ऐकायला बाध्य करते व त्यामुळे प्रत्येकाच्याच कल्पनाशक्तीचा विकास होऊ शकतो. सौंदर्याच्या अंतीम सत्यस्थितीकडे जाणारा प्रत्येकच माणसाचा प्रवास हा कायम अपूर्णच राहतो कारण माणसाचे अल्प जीवन त्या सत्याची व सौंदर्याची अतिभव्य संकल्पना पूर्णपणे समजून घेण्यासाठी तुटपुंजे पडते. सौंदर्याच्या सत्येतेला जाणून घेण्याचा हा प्रत्येकच माणसाचा प्रवास तसे बघितल्यास ईश्वराचा शोध घेण्यासारखाच आहे. कारण प्रतिकात्मक स्वरुपात आपल्या सभोवताली अस्तित्वात असलेल्या परमेश्वराच्या विविध द्वैत रुपांपासून त्याच्या अद्वैतरुपापर्यंतचा प्रवास हा देखील सौंदर्यसाधनेसारखाच आहे आणि म्हणूनच या कवितेमधे किट्सने जे सत्य आहे ते सुंदर आहे व तेच शाश्वत आहे असा विचार मांडला आहे. जो विचार भारतीय संस्कृतीमधे सत्यं, शिवं, सुंदरम या स्वरुपात आपल्याला बघावयास मिळतो. न ऐकलेले गाणे, न साकारलेले स्वप्न, न पूर्ण झालेले कार्य, न जुळलेली नाती या साऱ्या बाबींमधील अपूर्णता कविला जास्त मोहवते कारण त्यामधील हुरहुर, त्यामधील कल्पकता त्या अपूर्णतेमुळेच जिवीत राहते व तिच मनाला विलक्षण मोहविते. किट्सच्या या ओळी आपल्याला म.पां. भावे यांनी लिहीलेल्या ओळींची आठवण करुन देतात….
स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा….!
आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात अश्या प्रकारची अपूर्णता असते. परंतू बरेचवेळा असल्या अपूर्णतांबद्दल आयुष्यभर रडत बसलेले नकारात्मक लोक आपल्याला वारंवार आढळतात. परंतू असल्या अपूर्णतांवर मात करुन जीवनाला अत्यंत आनंददायी बनविता येऊ शकते. असाच एक कलंदर होता प्रतिक. बाराव्या वर्गातला प्रतिक मला भेटला तेव्हा त्याच्या उजव्या पायाचे ऑपरेशन झाले होते. एका महिन्याआधी सायकलहून महाविद्यालयात जाताना प्रतिकच्या पायावरुन गाडीचे चाक गेले होते. त्याचे नशिब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला होता. पायाच्या हाडांचा अक्षरशः चुरा झाला होता व त्यामुळे त्याचा पाय मांडीपासून कापावा लागला होता. त्या पायाच्या जागी एक कृत्रीम पाय लावण्यात आला होता. मोठे ऑपरेशन झाले होते व त्यामुळे त्याला संपूर्ण आराम सांगितलेला होता. त्याच्या बाबांची माझी एका परीषदेमधे भेट झाली होती व त्यामधूनच मैत्री झाली असल्याने मी प्रतिकला भेटायला त्याच्या घरी गेलो. पहिल्यांदाच मी त्याला भेटत होतो. परंतू त्याच्या ऑपरेशन बाबत त्याच्या वडीलांकडून सगळा वृत्तांत कळला होता. प्रतिक आतल्या खोलीत होता व त्याची फीजीओथेरेपी करायला एक माणूस आला असल्याने मी बाहेरच बसलो. पोराचे इतके मोठे ऑपरेशन झालेले असल्याने त्या घरची मंडळी जरा दुःखातच असतील असा माझा समज होता. कारण प्रतिकला नीट चालता येईल की नाही याची खात्री नसल्याचे त्याच्या वडीलांनी सांगितले होते. अश्या प्रकारचा संभ्रम असताना त्या घरातले वातावरण किती तणावपूर्ण असेल याची कल्पनाच न केलेली बरी…परंतू मला मात्र त्या घरात वेगळाच अनुभव येत होता. त्या घरातील सगळेच लोक अत्यंत खुश व आनंदात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रीलॅक्स वाटत होते. मला ते सारे विचित्र वाटत होते. मला खायला त्या वहिनींनी आईसक्रीम आणल्यावर मात्र मला रहावले नाही. मी हळूच माझ्या मित्राला विचारले…यार प्रतिकचे असे झाले..मी आईसक्रीम कसे खाऊ… माझी अडचण माझ्या मित्राच्या लक्षात आली. तो म्हणाला.. यार बिनधास्त खा..तू अजून प्रतिकला भेटायचा आहेस. त्याला भेटल्यावर तुला आमच्यासारखेच बिनधास्त वाटेल…मला जरा कुतुहल वाटले. जरा वेळाने मी प्रतिकच्या खोलीत गेलो… एक पाय कापून टाकून त्याच्याजागी कृत्रीम पाय लावला असुनही अत्यंत गोड हसत आणि माझ्या हातावर टाळी देत त्याने माझे स्वागत केले. त्याच्याकडे बघितल्यावर मला अचानक प्रसन्न वाटायला लागले. त्याच्या वडीलांनी माझी ओळख करुन दिली आणि मी त्याला भेटायला आलो म्हणून सांगितले. त्यानंतर त्याने काय म्हणावे.. काका, नवा पाय लागला मला….मज्जा आली….आता मला चालता येणार…पण काका, मी तेव्हड्यावर समाधानी नाही…मी खूप प्रॅक्टीस करणार आहे…मला येत्या गणपती मधे माझ्या ढोल पथकामधे ढोल वाजवायचा आहे आणि धमाल नाचायचे आहे…मी मस्त नाचू शकतो काका…यावर्षी माझ्या पथकात मी लीड ड्रमर होणार आहे…मला हे स्वप्न पूर्ण करायचेच आहे…वगैरे वगैरे… दहा पंधरा मिनीटे त्याचे ते स्वप्न ऐकल्यावर बाहेर पडताना त्याच्या वडीलांनी माझ्या खांद्यावर हात ठेऊन मला सांगितले…यार, प्रतिक खरे तर यापुढे नीट चालू शकला तरी खूप आहे..नाचणे वगैरे तर दिवास्वप्नच आहे.. पण मी ते मोडत नाही कारण त्याचे स्वप्न म्हणजे त्याच्यासाठी एक न गायलेले सुंदर गीत आहे. मला किट्स चे वाक्य आठविले, Heard melodies are sweet, but those unheard are sweeter. गायलेले गीत सुंदर असतेच परंतू न गायलेले जास्त सुंदर असते…
आपल्याही आयुष्यात अश्या न गायलेल्या गीतांना प्रत्यक्षात ऐकण्याची स्वप्ने बघावीत आणि त्या स्वप्नांना पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी सकारात्मकतेने मनापासून प्रयत्न करावे…जगण्याला त्यानेच खरा अर्थ प्राप्त होतो…