Monday, 10 July 2017

Quote-Unquote

मी निसर्गाचा, निसर्ग माझा                       

 The anchor of my purest thoughts, the nurse,

The guide, the guardian of my heart, 

and soul of all my moral being.

                          William Wordsworth

इंग्रजी वाड़मयाच्या दैदिप्यमान परंपरेत सर्वोत्कृष्ट निसर्गकवी म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या विलीयम वर्डस्वर्थ या कवीने Tintern Abbey नावाच्या एका अप्रतिम कवितेमधून मानवाने निसर्गाबाबत राखावयाची भूमिका मांडलेली आहे. निसर्गाचे मोल मानवाच्या जिवनात किती अत्युच्च दर्जाचे आहे हे स्पष्ट करीत असताना वर्डस्वर्थने या वरील ओळींमधे एक चिरंतन संकल्पना मांडली आहे. निसर्गाशी संवाद साधताना त्याच्याशी संपुर्णपणे एकरुप झालेला कवी वेगवेगळ्या प्रतिमांनी निसर्गाचे त्याच्या जिवनातील स्थान स्पष्ट करतो. सर्वप्रथम तो त्याला मानवाच्या अतिपवित्र विचारांचा मुलाधार संबोधतो. पवित्र विचार ही केवळ मानवाच्या भाग्याची बाब असते. कारण मुळात पावित्र्य किंवा अपावित्र्य या संकल्पनाच मनावी सभ्यतेचा पाया अाहेत. मानवाच्या सभ्यतेच्या परिमाणांमधे त्याच्या मनातील प्रामाणिक पवित्र विचार हेच त्याच्या चांगल्या कर्माला कारणीभूत असतात. या पवित्र विचारांचे वेगवेगळे स्रोत मानवाला लाभलेले असतात. त्याच्या आजुबाजूचे मानवी वातावरण, त्याच्यावर होणारे वेगवेगळे संस्कार, त्याला मिळणारे शिक्षण या सर्व बाबी त्याच्या विचारांच्या पावित्र्याला मजबूत करीत असतात. कवीच्या मते या स्रोतांसोबत एक अत्यंत महत्वाचा स्रोत म्हणजे निसर्ग होय कारण निसर्गात जे काही आहे ते सारे पावित्र्याचे प्रतिक आहे. निसर्ग सदोदित अत्यंत पवित्र स्वरुपामधे मानवाच्या जीवनाला पूरक असतो. त्यामुळेच मानवीय सभ्यतेमधे अपेक्षित असा पावित्र्याचा आधार निसर्गच राहू शकतो. कवी निसर्गाला परीचारीकेची उपमा देतो जी वेदनांवर फुंकर घालण्याचे काम करते. मानवाच्या आयुष्यात येणाऱ्या विविध वेदनांच्या जखमा भरुन काढण्याचे काम देखील निसर्ग अनेक वेळा करतो. या संबोधनांमधे पुढे कवी निसर्गाला मार्गदर्शक मानतो सोबतच त्याच्या ह्रदयस्थ मानवी विचारांचा पालक देखील संबोधतो. मानवी जीवनाचे निर्वहन होताना निसर्गाशी एकरुप झाल्यावर त्याच्या मार्गदर्शक असण्याची पदोपदी जाणीव होते. त्यासाठी निसर्गावर प्रेम करणे क्रमप्राप्त आहे. यासोबतच त्याच्यावर संपुर्ण विश्वासही टाकण्याची आवश्यकता आहे. विश्वास ही संपुर्णपणे मानसिक अवस्था आहे. त्याला व्यवहाराशी जोडता येत नाही. दुर्दैवाने वर्डस्वर्थप्रमाणे निसर्गाला व्यावहारिक देवाणघेवाणीच्या पलीकडे जाऊन अद्यापही आपल्याला स्विकारता आलेले नाही त्यामुळे आपल्यासाठी निसर्गाचे मार्गदर्शक पद आपल्याला अनुभवता येत नाही. कवीला तर निसर्ग त्याच्या जीवनाचा मुलाधार वाटतो आणि म्हणूनच या अवतरणाच्या शेवटच्या ओळीत कवीने निसर्गाचे मानवाच्या आयुष्यातील सर्वोच्च स्थान वर्णन केले आहे. निसर्गाप्रती वेगवेगळी संबोधने सांगत असताना शेवटी तो त्याला मानवी जीवनाशी निगडीत सर्व नितीमुल्याधिष्टीत बाबींचा आत्मा मानतो. निसर्ग मानवाच्या जीवनातील मुल्ये सांभाळणारा मुल्यांची जडणघडण अत्यंत साकारात्मकतेने करणारा दुवा आहे असे सांगताना वर्डस्वर्थ ने त्याच्या स्वतःच्या चिंतनाने जगासमोर मांडलेली एक अभूतपूर्व संकल्पना Paganism स्पष्ट केली आहे. उपरोक्त ओळींमधील निसर्गाचे रुप जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयास करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की जवळपास हीच संकल्पना देवाच्या रुपाने आपण आपल्या जीवनात स्विकारलेली आहे. पावित्र्याचे स्वरुप, आपल्या दुःखांचे हरण करणारा आपल्या सबंध जिवनाचा आत्मा असेच तर परमेश्वराचे स्वरुप आपण पाळत आलेलो आहोत. वर्डस्वर्थने निसर्गाला परमेश्वर मानुनच त्याचे मानवी सभ्यतेतील महत्व या ओळींमधे मांडलेले आहे. वर्डस्वर्थची ही संकल्पना Paganism म्हणून अत्यंत प्रसिद्ध झालेली आहे. परमेश्वराशी एकरुप होताना ज्या समर्पणाची भावना आपल्या सर्वांच्या मनात येते तश्याच प्रकारची भावना कवीच्या मनात येऊन सबंध मानव जमातीला हितकारक अशी संकल्पना या ओळींमधून आपल्याला निसर्गाचे महत्व पटवून देते. परमेश्वरस्वरुपी असलेल्या निसर्गाला आपले मानत असताना त्याच्यासोबत आपला व्यवहार कसा असावा याबाबत देखील विस्तृत वर्णन वर्डस्वर्थ ने या कवितेत केले आहे. परंतू परमेश्वराशी लीन होताना पावित्र्याची सारी बंधने पाळणारे आपण निसर्गाशी वागताना मात्र हिंस्त्र, क्रूर कमालीचे स्वार्थी झाल्याचे पदोपदी जाणविते. निसर्ग माझा परमेश्वरच आहे ही भावना रुजविण्यात आपण कमी पडलो त्याचे भयावह परीणाम आजही भोगावे लागत आहेत नव्हे मानवी सभ्यतेच्या भविष्यातील अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेय..

अमरावतीहून वरुड नावाच्या गावी मावशीच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त तिला सर्प्राईज देण्यासाठी आम्ही सारे गाडीने निघालो. धमाल करीत प्रवास करण्याची सवय असल्याने सोबतच मुलांना फोटो काढण्याची आवड असल्याने कॅमेरा सोबत होता. अमरावती वरुड मार्गावर खरेतर कुढे फोटो काढण्याची संधी मिळेल असे आपणास वाटत असेल. परंतू मावशीकडे नेहेमीच जाणे असल्याने या मार्गाचे सौंदर्य मला ठाऊक होते. आज ते मुलांना दाखवायचे होते. शहराच्या सिमेंटच्या जंगलाला सोडून आम्ही गावाच्या बाहेर पडलो मग खरी गंमत सुरु झाली. या साधारण ऐंशी किलोमीटरच्या रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा महाकाय हिरवीगार डेरेदार वृक्षराजी आहे. मधल्या गावांचा भाग सोडला तर हा मार्ग जवळपास दोन्ही बाजुच्या वृक्षांनी अत्यंत रमणीय झाला आहे. जसजसे वेगवेगळ्या झाडांनी झाकलेला रस्ता येऊ लागला तसतसे मुले उत्साहित होत गेली. थोड्या थोड्या अंतरांवर गाडी थांबवून मुले छान फोटो घ्यायला लागली. काही ठिकाणी तर सरळ एक किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजुंनी झाडांची सुंदर कमान तयार झालेली दिसत होती. एखाद्या चित्रपटातील सुंदर निसर्गदृष्यात शोभावे असे कितीतरी देखावे या मार्गावर दिसत होते. मुले आनंदात होती म्हणून मी देखील त्यांना प्रोत्साहन देत गेलो. त्यांनी वेगवेगळ्या झाडांजवळ वेगवेगळ्या पोजमधे फोटो काढून घेतलेत्या निमित्ताने आम्ही त्या झाडांचे मनापासून कौतुक करु शकलो. झाडांची नावे, त्यांचे वय, त्यांचा आकार याबाबत छान चर्चा झाली. ती झाडे जणू आमच्यासोबतच मावशीच्या वाढदिवसाला निघाली होती अश्या पद्धतीने मुले त्यांच्याबद्दल बोलत होती. वरुडला पोहोचता पोहोचता माझ्या मुलांनी एका सुरात माझे अत्यंत आवडीचे वाक्य उच्चारलेबाबा आज मज्जा आली. त्यांना घेता आलेला आनंद त्या मार्गावरील खूप साऱ्या वृक्षराजींमुळे मिळाला होता. निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेऊन आम्ही अत्यंत आनंदात मावशीला वाढदिवस साजरा करण्याचे सर्प्राईज दिले. तिला खूप आनंद झाला. मावशीसाठी नेलेल्या मस्त पदार्थांचा केकचा आस्वाद घेतानाच काकांनी एक बातमी सांगितली…..आणि….घास घशातच अडकला. काय बोलावे ते सुचेना….माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसेना..ती गोष्ट मुलांना कशी सांगू याचे मला जास्त दडपण आलेखूप सारा आनंद मिळविल्यावर त्यांना ती गोष्ट ऐकून कसे वाटेल याचा मी विचार करु लागलो

काकांनी सांगितलेलवकरच अमरावती बैतुल या रस्त्यावरुन महाष्ट्रातील मध्यप्रदेकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे त्यासाठी अमरावती वरुड हा मार्ग चौपदरी केला जाणार आहे ज्यासाठी…. या रस्त्याच्या दुतर्फा असणारी जवळपास सगळी झाडे कापली जाणार आहेत…. काकांनी दिलेल्या माहितीवर काय प्रतिक्रीया द्यावी हे देखील मला सुचले नाही. परत येताना मुले पुन्हा त्या झाडांनी हिरव्यागार असलेल्या मार्गाचा आनंद घेत होती..फोटोंमधील झाड पुन्हा दिसल्याचा उत्साह त्यांच्या प्रतिक्रीयांवरुन जाणवित होता..मी त्यांचा तो आनंद कमी केला नाही..परंतू त्या झाडांकडे जणू शेवटचे बघतोय असे मला वाटत होते..वर्डस्वर्थने ज्या निसर्गाला मानवाच्या जीवित अस्तित्वाचा आत्मा मानले होते तोच तो निसर्ग होताज्याची अमानुष कत्तल केली जाणार होती..मानवाच्या विकासाचा आलेख उंचावण्यासाठी..त्या मानवाच्याच कल्याणासाठी मजबुतीने उभ्या असलेल्या झाडांना कापून टाकले जाणार या विचाराने डोळ्यात नकळत अश्रू दाटून आलेमोठ्या सफाईने मी त्यांना मुलांच्या नकळत पुसून टाकले परंतू  मनाचे रुदन मात्र अद्याप सुरु आहे

 


No comments:

Post a Comment

Quote-Unquote@05.09.17 (Last Article)

   आधुनिक यंत्रजीवन                      “What shall I do now? What shall I do?” “I shall rush out as I am, and walk the street “With m...