छंद जीवनाचा
“Happy is the man who can make a living by his hobby”
― George Bernard Shaw, Pygmalion
इंग्रजी मराठीतील प्रख्यात लेखक पु.ल. देशपांडे यांनी लिहीलेल्या ती फुलराणी नावाच्या नाटकाचे मूळ रुप असलेल्या Pygmalion या जॉर्ज बर्नार्ड शॉ या अत्यंत प्रतिभावान नाटककाराच्या नाटकातील ही ओळ जगातील काही विशेष भाग्यवान मंडळींबद्दल उल्लेख करते. मानसशास्त्रीय दृष्टीकोनाचा विचार करता प्रत्येक व्यक्तीचा एक मुलभूत ढाचा असतो जो त्याला त्याच्या पुर्वजांकडून प्राप्त झालेला असतो. असे असले तरी बराचसा भाग हा त्या व्यक्तीचा स्वतःचाच असतो जो त्याच्या मानसिक चौकटीनुसार तयार झालेला असतो. यामधूनच व्यक्तीमत्व तयार होते जे इतर सर्वांपेक्षा वेगळे असते. या व्यक्तीमत्वानुसारच मग प्रत्येकाच्या आवडी निवडी तयार होत जातात. काही प्रमाणात सभोवतालच्या वातावरणाचा परीणाम देखील या आवडी निवडी तयार करण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. व्यक्तीवर होणाऱ्या संस्कारांमधून तसेच त्याच्या मुलभूत मनोभुमिकेमधून छंद निर्माण होतात. छंद ही परमेश्वराकडून माणसाच्या जीवनाला मिळालेली एक संजीवनी आहे ज्यामुळे त्याचे जीवन सुंदर बनविण्यास मदत होते. छंद ही शिबीरामधे शिकता येण्यासारखी बाब नाही. छंद ही जीवन सुंदर बनविण्याची मूळ प्रवृत्ती असते जी सामान्य व साचेबद्ध जीवनाच्या चौकटीच्या पलीकडची असते. आपल्या समाजात छंद ही अभ्यासेतर किंवा वेळ घालविण्यासाठी केली जाणारी बाब मानले जाते. परंतू ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. छंद ही मनाच्या गाभाऱ्यातून निर्माण झालेली व माणसाच्या मूळ प्रवृत्तीचे स्वच्छ प्रतिबिंब उमटवणारी एक अप्रतिम बाब असते व फार कमी लोक आहेत ज्यांना या छंदांना वय वाढल्यानंतरही जपता येते आणि जॉर्ज बर्नार्ड शॉच्या मते तर ज्या माणसासाठी त्याचा छंद त्याच्या उपजीविकेचे साधन बनते तो जगातील सर्वात आनंदी माणूस आहे. किती खरे लिहीतो बर्नार्ड शॉ… अन्यथा अनेकवेळा अर्थार्जनाच्या धावपळीत आपल्यापैकी अनेकांचे छंद जुन्या पेटीमधे बंद करुन माळ्यावर टाकले असतात. पहाटे पासून तो रात्री पर्यंत केवळ पैसा मिळविण्याचा विचार करीत जगणारे अनेक लोक आपल्याला भेटतात.. पहाटे फिरायला छान निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावरही कालच्या मार्केटमधील शेअर्सच्या जोरजोरात गप्पा करणारे महाभाग बघून त्यांची कीव करावीशी वाटते. जीवनाची आवश्यकता अश्या प्रकारचे लेबल लावून एखाद्याचे सकाळपासून जे धावणे सुरु होते की ते रात्री पर्यंत थांबतच नाही. कामे, अडचणी, ट्रॅफीक, लेटमार्क, कामाचा ताण, कार्यालयातील गोंधळ, बिघडलेला कॉम्प्युटर, डाऊन असलेली लिंक, पंक्चर झालेली गाडी, बाजारहाट, किराणा, खरेदी, अचानक आलेला पाऊस, नेमका विसरलेला रेनकोट, पाण्याने ओला झालेला मोबाईल फोन, अंतिम तिथाच्या पुढे गेलेले व भरायचे राहीलेले विजेचे बील, मुलांची ॲडमीशन, त्याच्या शाळेतील पालकसभा, तब्येती, डॉक्टरकडील चकरा, पाहूणे, सणवार, पुजा-अर्चा, कर्तव्यपूर्ती, त्याचा लोकांना मिळणारा आनंद या सर्व अनंत व्यापांतून त्या छंद नावाच्या सुरेख गोष्टीसाठी वेळ निघतच नाही.. व म्हणूनच त्या छंदाला बऱ्याच लोकांनी जुन्या लोखंडी पेटीमधे बंद करुन ठेवलेले असते. काहीच लोक भाग्यवान असतात की ज्यांना त्या छंदाचा आधार घेऊनच आयुष्याच्या या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडता येतात. कधी कधी व्यावहारिकतेमधून व जगाच्या लेखी आर्थिकदृष्ट्या सक्षमता दाखविण्यासाठी या छंदांसोबत तडजोडी कराव्या लागतात. मनाला न पटणारे करत बसावे लागते. आयुष्य निघून जाते परंतू गवसणी घालून अडगळीत ठेवलेला एखादा तानपुरा, जुन्या कपाटावर ठेऊन दिलेले व्हायोलीन, ॲल्युमीनीयनच्या डब्यात माळ्यावर ठेऊन दिलेले घुंगरु, मोठ्या आवडीने स्वहस्ताक्षरात लिहून काढलेल्या गाण्यांची जुनी पण विसरुन गेलेली ती वही किंवा सुंदर चित्र काढण्याचा कॅनव्हास…अडगळीत पडलेला असतो…वर्षानु वर्षे वाट बघत… छंद जोपासणाऱ्या माणसाची…ज्याची अनेक वर्षे रहाटगाडगे ओढण्यात निघून जात असतात..कधीही परत न येण्यासाठी. रहाटगाडग्याचे हे ओझे ओढता ओढता त्याची इतकी सवय होऊन जाते की मग आपला काही छंद होता व त्यामधून खूप खूप आनंद मिळत होता याची आठवणही येत नाही. कधी कधी दोन पेग पोटात गेल्यावर किशोरकुमारचे हलत्या आवाजात गाणे म्हणून…यार क्या गाता था मै..असे म्हणत पुढचे दोन पेग रीचविण्यासाठी तो पुढे सरसावतो किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात अनेकांच्या आग्रहास्तव सुंदर गाणे म्हणल्यावर जेव्हा सारे जण तिचे कौतुक करतात तेव्हा तिलादेखील बंदीशी लिहीलेली जुनी वही आठवते…हळूच डोळ्यातून त्या आठवणीने डोळ्यातून दोन आसवे ओघळतात…. परंतू पुढच्याच क्षणी तिला आठवते की मुलाची शाळा सुटण्याची वेळ झाली… ती लगेच सुसाट त्या दिशेने निघते.. अनेकांच्या आयुष्यात असे अनेक छंद अडगळीत पडलेले असतात… एखादाच हिम्मत करतो व समोरचे सारे बाजूला सारुन शुभ्र कॅनव्हास समोर धरतो आणि आपल्या छंदाला उपजिवीका बनविण्याचे धाडस करतो… माझ्या एका मित्राने ते केले….
जेजे आर्ट्स महाविद्यालयातून पदवी घेतलेल्या संजुला खरे तर सुंदर चित्रकला करायची होती. परंतू जे इतरांच्या बाबत होते तेच त्याच्या बाबत झाले. चित्रकाराचा कुंचला हाती येण्याऐवजी संगणकाचा की बोर्ड व माऊस त्याच्या हाती आला. आर्थिकदृष्ट्या यशस्वी होणे व ते देखील समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत राहूनच होणे आपल्या समाजपद्धतीत फार आवश्यक बाब आहे. यापेक्षा वेगळी वाट चोखंदळायची म्हणली तर समाजाचा दबाव निर्माण होतो व त्यामुळे त्या वेगळ्या वाटा बाजूला सारुन परंपरागत आणि लोकांना आवडेल असे जगणे सुरु होते. संजुचे त्या मानाने जरा बरे होते. संगणकावर तो विविध कलात्मक डीझाईन्स बनवून द्यायचा, तर कधी जाहीराती बनवायचा. त्याच्या कलात्मक गुणांना तसा बऱ्यापैकी याही क्षेत्रात वाव होता. सुरंख मांडणी, रंगसंगती व सादरीकरण या बाबींमुळे संजू तसा यशस्वी आर्टीस्ट म्हणून ख्याती प्राप्त होता. परंतू तरीही काहीतरी महत्वाचे त्याच्या आयुष्यात हरवलेले होते. ते म्हणजे प्रत्यक्ष कॅनव्हासवर तो करीत असलेली चित्रकला. संगणकाच्या माध्यमातून सारे काही रेडीमेड मिळत असल्याने आपण केवळ चांगले रचनाकार आहोत अशी भावना संजूच्या मनात बळावत होती. हे संगणकावरचे काम त्याला चांगला आर्थिक स्रोत बनले होते परंतू मन मात्र त्या मूलभूत छंदाकडे, त्या आवडीकडे ओढ घेत होते. आयुष्याच्या मध्यावर त्याची सुरु असलेली तगमग फार विचित्र होती….आणि एके दिवशी संजूने एक अभूतपूर्व निर्णय घेतला… त्याने आपल्या मनाचे ऐकायचे ठरविले….
संगणकावरील सारे काम एका क्षणात बंद करुन त्याने थेट घरी वरच्या खोलीमधे कॅनव्हास उभा केला व पेंटींग सुरु केले. काय होईल किंवा कसे होईल याचा अजिबात विचार न करता… आपल्या मनाची हाक ऐकली… बस्स मग काय! त्याच्या मनाप्रमाणे त्याचा एक अत्यंत आनंददायी प्रवास सुरु झाला. मुळातच अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा कलावंत तो असल्याने अल्पावधीतच त्याला त्या सर्व प्रकारावर चांगली पकड आली. आता संजूच्या चित्रांची दिल्ली किंवा मुंबई यासारख्या महानगरांमधे प्रदर्शने भरतात. त्याच्या चित्रांच्या वेबसाईटला जगभरातून छान प्रतिसाद मिळतो. विदेशातील चित्रकार देखील त्याच्या चित्रांवर भाष्य करतात. संजू स्वतः देखील त्याच्या चित्रांबद्ल भरभरुन बोलतो. त्याच्यामागील संकल्पना सांगताना तो कमालीचा उत्साहात असतो. त्याची चित्रकला आता त्याच्या चांगल्या उपजिवीकेचे साधन बनलेली आहे व सोबतच महत्वाचे म्हणजे त्याला मनापासून आनंद मिळतोय…त्याच्या मुलभूत छंदाला जपण्याचा… बर्नार्ड शॉचे वाक्य संजूने तंतोतंत सिद्ध केले व म्हणून तो आनंदी झालाय..
संजूप्रमाणे आपल्यालाही आपल्या मनातील मुलभूत आवडीचा किंवा छंदाचा आवाज ऐकता येईल? आपल्यालाही अडगळीत टाकून दिलेले छंद बाहेर काढता येतील? गाणे गुणगुणता येईल किंवा कोपऱ्यात पडलेल्या सतारीची गवसणी काढता येईल? आपले छंद म्हणजे निखळ आनंद मिळविण्याचे स्रोत आहेत…त्यांची आठवण करुयात…
सुंदर कलात्मक पण जीवनाचे खरे अनुभव संपन्न शब्दचित्र होय,
ReplyDeleteआपले हार्दिक अभिनंदन देवा