मृत्यूक्षण
“I would hate that death bandaged my eyes, and forbore,
And bade me creep past.
No! Let me taste the whole of it, fare like my peers,
The heroes of old
Bear the brunt, in a minute pay glad life’s arrears
Of pain, darkness and cold.”
― Robert Browning / Prospice
इंग्रजी रॉबर्ट ब्राऊनिंग या अत्यंत प्रतिभाशाली कवीच्या या ओळी मानवी जीवनाच्या अंतिम सत्याचा आधार घेऊन एक अद्भूत विचार मांडतात. मानवी जीवनाचा अंतिम टप्पा म्हणजे मृत्यू. या सबंध जगरहाटीचे संचालन करणाऱ्या शक्तीचा इवलासा अंश बनून प्रत्येक जीव या जगामधे प्रवेशित होतो. अत्यंत जटील परंतू चमत्कारिक प्रक्रीयेद्वारे आईच्या उदरात वाढलेल्या गर्भाला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होऊन या जगात पहिला मोकळा श्वास रडण्याच्या स्वरुपात घेऊन जीवन आरंभ होतो. ज्या क्षणाला मातेच्या शारीरिक अस्तित्वापासून विलग होऊन स्वतंत्र जिवनाची सुरुवात होते त्याच क्षणी त्याचा कालावधी सुनिश्चित करण्यात आलेला असतो. या विश्वातील कुणाचा कालावधी किती हे मात्र कुणालाच ठाऊक नसते. जगणे सुरु होते. वेगवेगळी नाती, वेगवेगळे भावबंध, आकांक्षा, स्पर्धा, यश, अपयश, मिळकत, मान, प्रतिष्ठा, चढाओढ, इर्षा, मत्सर, माणसे जोडणे, माणसे दुखावणे, क्षणांचे आनंद या सर्व जीवन प्रक्रीयांमधून प्रत्येकाची वाटचाल सुरु होते. हे सारे करीत असताना त्या ठरवून दिलेल्या क्षणाचा मात्र बरेचवेळा विसर पडलेला असतो. बरेच वेळा तर जगण्याचा आवेश इतका जास्त असतो की अश्या व्यक्तिंच्या जीवनात तो शेवटचा बिंदू नाहीच अशी त्यांची समजूत आहे असे जाणवते. अनेक तत्वज्ञ असे सांगतात की जीवनाचा आनंद घ्यावा व मृत्यूला विसरुन जावे. हे जरी खरे असले आणि जगणारे आयुष्य हे आनंदीच असावे हे संपुर्णपणे स्विकारुनही एक गोष्ट नाकारता येत नाही आणि ती म्हणजे या जगातील प्रत्येकाचे वास्तव्य हे कालमर्यादित आहे व त्यामुळे जगण्याचा आनंद घेण्यापेक्षा त्याचा हव्यास असणे ही बाब मोठ्या प्रमाणात आढळते. जगण्याची तीव्र इच्छा असलेल्या माणसालाही कधी कधी मृत्यूची याचना करावी लागते असेही प्रसंग याच जगात घडतात. मृत्यू ही अपरीहार्य बाब असल्याने त्याबाबत लिहीताना रॉबर्ट ब्राऊनिंग फार स्पष्ट वर्णन करतो. त्याच्या मते खितपत खितपत येणारा मृत्यू त्याच्यासाठी तिरस्कारणीय आहे. जन्म आणि मृत्यू ही बाब सर्वस्वी त्या अनादी अनंत परमात्म्याच्या अखत्यारीतील असली तरी मृत्यू कसा यावा याबाबत इच्छा व्यक्त करता येऊ शकते. रॉबर्ट ब्राऊनींग म्हणतो, हळू हळू येणारा मृत्यू त्याला नकोय..मृत्यूच्या सावलीमधे रोज थोडे थोडे मरत राहणे त्याला मान्य नाही. युद्धामधे एखादा वीर ज्याप्रमाणे तलवारीच्या एकाच वारात धराशायी होतो…एका क्षणात कोसळतो त्याप्रमाणे कवीला मृत्यूचा सामना एका क्षणात करायचा आहे. पराभव निश्चित असलेली ती लढाई आहे परंतू कवीला ती एका क्षणात हरायची आहे. मृत्यूच्या अतीव वेदनेचा प्रचंड आघात त्याला एका क्षणात सहन करुन संपवायचा आहे. रॉबर्ट ब्राऊनिंगच्या काव्यप्रतिभेतून एक सुंदर कल्पना उदयाला येते…अशी कल्पना जी केवळ जीवनावर नितांत प्रेम करणारा परंतू मृत्यूला कधीही न विसरलेला व्यक्तीच करु शकतो. अन्यथा केवळ स्वतःच्या जीवनावर प्रेम करत करत, इतरांना जमेल तसे जास्तीत जास्त दुखावत, अपशब्दांनी वेदना देत, इतर कुणालाही समजून न घेता, अधिकारांचा अवास्तव गैरवापर करत, केवळ स्वार्थी भुमिकेतून जगणाऱ्या मंडळींच्या मनात अशी कल्पना येणे अवघड असते. धडपडीने गोळा केलेले देऊन टाकणे ही त्यांच्याकरीता सर्वात कठीण बाब असते. परंतू रॉबर्ट ब्राऊनिंगने मात्र अतिशय सुंदर कल्पना मांडून मृत्यूला स्विकारण्याचा मार्ग सांगितला आहे. तो म्हणतो, एका क्षणात मृत्यूचा आघात झेलून जीवन संपविणे म्हणजे….एका क्षणात आनंदी आयुष्याची थकबाकी फेडून टाकणे होय…व मला तेच करायचे आहे. अत्यंत आनंदात घालविलेले आयुष्य एकाच क्षणात शांत करायचे आहे….तो क्षणच असा असतो की त्या रेषेपलीकडे शरीराच्या रुपाने निर्माण झालेल्या भौतिक, भावनिक किंवा ऐहिक अस्तित्वाचा लवलेशही उरत नाही…सारे काही मागेच रहाते. त्या क्षणाच्या आधल्या क्षणापर्यंत आत्म्याचा वास असलेल्या शरीराला संचालित ठेवण्यासाठी जीवापाड धडपड सुरु असते…कसेही करुन त्या शरीराचे संचालन सुरु रहावे हा प्रयत्न सुरु असतो. परंतू प्रत्यक्ष मृत्यू क्षणानंतर लगेच त्या शरीराची विल्हेवाट लावण्याच्या चर्चा सुरु होतात. ती रेष इतकी तदर्थ असते. यासाठीच त्या रेषेकडे रांगत रांगत जाणे कवीला मान्य नाही…त्याला एका क्षणात जीवनआनंदाची थकबाकी ज्याने आनंदी जीवन दिले त्याला परत करुन त्याच्यातच विलीन व्हायचे आहे….अर्थात असा मृत्यू यावा किंवा नाही ही मानवाच्या क्षमतेपलीकडची बाब आहे. परंतू तशी इच्छा कवीने व्यक्त केली आहे कारण बरेचवेळा शरीराची व मनाचीही जगण्याची इच्छा संपलेली असताना त्याला जगविण्याचा हट्ट केला जातो…त्या व्यक्तीवरील प्रेमापोटी तसे केलेही जात असेल पण रॉबर्ट ब्राऊनींग मृत्यूक्षण क्षणात यावा असे का म्हणतो हे समजून घ्यायला हवे.
काकांना नागपूरला एका मोठ्या दवाखान्यात भरती केलेय असे कळल्यावर त्यांना भेटायला गेलो. डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला होता व गावाला उपचार लवकर न झाल्याने त्यांची स्थिती फार वाईट होती. डॉक्टर मंडळी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न शर्थीने करत होते. परंतू दिवसागणिक त्यांच्या शरीरामधे विविध समस्या निर्माण होत होत्या. दवाखान्यात भरती केल्यापासून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा आत जावे की नाही हा संभ्रम मनात निर्माण झाला होता. अत्यंत उत्साहात असणारे, छान सहा फुट उंची आणि प्रत्येकाशी मनमोकळेपणाने बोलणारे काका त्या आयसीयुमधे कसे दिसत असतील याची कल्पनाच करवत नव्हती. बरे मी आत जाऊन करणार तरी काय होतो. पण इतक्या लांबून आलास ..निदान त्यांना बघून तर ये.. कारण डॉक्टर फार आशा नाही म्हणतात…असे मावशीने म्हणल्यामुळे मी त्यांना भेटायला आतमधे गेलो. त्यांची ती अवस्था मनाला सहन होण्यापलीकडली होती. काकांच्या शरीराला जवळपास पंचेवीस नळ्या लावल्या होत्या. घश्याला छिद्र करुन त्यातून दोन मोठ्या नळ्या टाकल्या होत्या. त्या नळ्यांचा त्यांना प्रचंड त्रास होत होता. पाठीमधेही एक छिद्र करुन नळी टाकलेली होती. कानामधून आणि नाकातून रक्तप्रवाह होऊन त्याचे डाग शरीरावर होते. त्यांच्याजवळ उभा राहून त्यांच्या डोळ्यात मी बघितले…क्षणभरच पण काकांनी मला सांगितले…मला आता काहीही सहन होत नाहीये..माझा सुटका करा… मला ब्राउनिंग आठवला…एका झटक्यात मृत्यूक्षण मागणारा…
दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्याने काकांचे व्हेंटीलेटर काढण्याचा निर्णय करण्यात आला… नियमानुसार पेशंटला देखील त्या निर्णयाची कल्पना द्यावी लागते. काकांना तो निर्णय सांगितल्यावर त्यांना बोलता आले नाही परंतू गेल्या वीस दिवसाच्या अपरीमित वेदनेनंतर पहिल्यांदा त्यांच्या चेहेऱ्यावर सभाधानाची लकेर दिसली. हलकेच डोळ्यातून एक अश्रु ओघळला…तो दुःखाश्रू होता की आनंदाश्रू ते ठाऊक नाही…परंतूवेदनेतून झालेल्या सुटकेचा समाधानाश्रू मात्र तो नक्की होता… ब्राऊनिंग किती योग्य होता…होय ना?
Khupach chan
ReplyDelete