Tuesday, 20 June 2017

Quote-Unquote

All the world’s a stage, and all the men and women merely players. 

They have their exits and their entrances; 

And one man in his time plays many parts.

- William Shakespeare

इंग्रजी वाड़मयातील सर्वश्रेष्ठ नाटककार म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या विलीयम शेक्सपीयरच्या As you like it नावाच्या नाटकातील हे जगप्रसिद्ध अवतरण ज्यात शेक्सपीयरने माणसाच्या जीवनाचे अप्रतिम वर्णन केले आहे. असे म्हणतात की इंग्रजी वाड़मयात माणसाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मानवी स्वभावाचे विविध पदर जितके शेक्सपीयरने उलगडून दाखविले तेवढे कुणालाही जमलेले नाही. त्याच्या वेगवेगळ्या नाटकांमधील विविध पात्रांच्या माध्यमातून मानवी समाजमनाचा उत्कृष्ट आलेख त्याने मांडला आहे. मानवी जीवनाचे सार मांडणाऱ्या या चार ओळी सर्वदूर अतिशय लोकप्रीय झाल्या कारण मानवी जीवनासंबंधीचे ते यतार्थ सत्य आहे. या सबंध मानवी विश्वाची त्याने एका भव्य रंगमंचाशी तुलना केली आहे. हे विश्व म्हणजे एक भव्य रंगमंच आहे आणि या विश्वातील स्त्री पुरुष या रंगमंचावरील विविध पात्रे आहेत. माणसाने खूप साऱ्या पाडल्या असल्या तरी मुळात दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष. सबंध जगातील स्त्री पुरुष आपापले पात्र रंगविण्यासाठी या जगात येतात. या रंगमंचावरचे हे महानाट्य अहोरात्र आणि कायम स्वरुपी सुरु असते. यामधे प्रत्येकाला एक भुमिका मिळालेली असते. या भुमिकेला वठविण्यासाठी रंगमंचावरचा प्रवेश आणि त्याचे गमन हे त्या विश्वाचे संचालन करणाऱ्या अफाट शक्तीने निश्चित केलेले असते. प्रवेशाची वेळ झाली की या विश्वरंगमंचावर स्त्री किंवा पुरुष यांचे आगमन होते. त्यानंतर सुरुवातीचा काही काळ रंगमंचाचा अंदाज घेण्यात जातो. त्यावेळी प्रत्येकच कलाकार हा अतिशय प्राथमिक स्वरुपाचा अभिनय करीत असतो. त्या रंगमंचाच्या भव्यतेची त्याला अद्याप कल्पना आलेली नसते. तो जरा बावरलेला, बुजलेला धास्तावलेला असतो. परंतू त्याच वेळी तो संपुर्णपणे प्रामाणिक असतो. प्रत्येकच माणसाच्या जीवनाचे असे योग्य वर्णन केल्यावर मात्र शेक्सपीयर पुढची ओळ लिहीतो ज्यात खरा आशय दडलेला आहे. रंगमंचावर बावरलेला आणि जरासा घाबरलेला मानव कलाकार नंतर जरा त्या झगमगाटाला सरावतो. त्याच्या मनातील ती सुरुवातीच्या पंधरा वीस वर्षांमधील हुरहुर देखील जरा स्थिरावते आणि मग त्याला कळायला लागते की या जगात यशस्वीरित्या वावरायचे असेल तर त्याला एकच भुमिका वठवून चालणार नाही. विविध नातेसंबंधांची गुफण आणि जगाचा व्यावहारिक बाज त्याला आता त्याच्या भुमिका समजवायला लागतो. त्याच्या ते हळू लक्षात येऊ लागते आणि मग त्याच्या वॉर्डरोबमधे कपड्यांसोबत मुखवट्यांचा देखील एक कप्पा तो ठेवायला लागतो. शेक्सपीयरचे वाक्य सकारात्मक पद्धतीनेच स्विकारुन ती काळाची गरज असते असे म्हणावे लागते कारण देश कोणताही असो, माणसे कोणत्याही प्रकारची असोतयशाच्या चढत्या कमानीलाच मुल्य देणारी व्यवस्था आपल्या आसपास असल्याने एकाच जीवनात विविध पात्रे रंगविणे प्रत्येकालाच क्रमप्राप्त असते. कार्यालयामधे असलेला माणूस हा तेथे बॉस असला तरी आणि तेथे ती भूमिका वठवावी लागत असली तरी घरी त्याला मुलांचा मित्र व्हावे लागते त्याही भुमिकेला न्याय द्यावा लागतो. प्रत्येकच नात्यांमधे वावरत असताना या कलाकाराला अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवाव्या लागतात. बरेचदा तर या साऱ्या भुमिका प्रामाणिकपणे साकारताना आपली मूळ भुमिका कोणती हा देखील प्रश्न पडतो. अश्यावेळी आपल्या सोबत प्रामाणिकपणे चालत असते एखादी सखी किंवा एखादा सखा ज्याने आपल्यातील विविध पात्रे साकारण्याची कलात्मकता निर्माण होण्याआधीची मनाची प्रामाणिक हुरहुर बघितलेली असते. आपल्याला संपुर्णपणे ओळखणारी आपले खरे प्रतिबींब डोळ्यात स्पष्टपणे उमटविणारी एखादी सखी किंवा विविध भुमिका वठवून यशस्वी होण्याच्या मार्गावर मार्गस्थ होण्याआधी खांद्यावर हात ठेऊन आपल्या ह्रदयाची धडधड कमी करणारा एखादा सखा भेटल्यावर मात्र….

तुला तुझ्या केबीनमधे बसलेले बघायचेयअसे म्हणून आपल्याला बघायला आलेला आपला एक जीवलग सखा अनेक वर्षांनंतर आपल्या समोर बसला असतो. तो देखील एक वेगळी भुमिका वठवत असतो आणि आपण देखील. तीस वर्षांचा मोठा काळ दोघांमधून निघून गेला असतो. या वर्षांमधे दोघांच्याही अनेक भुमिका वठवून झाल्या असतात नव्हे त्यात सराईतपणा देखील आला असतो. दोघांमधील मैत्रीची भूमिका फारच प्रामाणिक असते त्यामुळे त्या भुमिकांमधे शिरायला वेळ लागत नाही. परंतू सराव झालेल्या भुमिकांच्या सावल्या माग सोडत नसतात. स्वाभाविकपणे तो आपल्याला कसे काय सुरु आहे असा प्रश्न विचारतो….बस्स् मग काय? आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या भुमिका किती अचूकपणे वठवून जीवनात यशस्वी झाल्याची ती सुरस कहाणी आपण त्याला सांगू लागतो. तो सोडून गेल्यावर आपण केलेला अभ्यास, त्या बळावर विद्यापीठातून प्रथम येण्याचा मिळालेला मानत्यावेळी डोळ्यात आलेले आनंदाश्रू. त्यानंतर नोकरी करताना आदर्श शिक्षक म्हणून केलेले कामविद्यार्थ्यांना वर्गात लावलेली कडक शिस्त. नोकरीसोबतच वाचनाचा वाढविलेला व्यासंग आणि घरी स्वतःची चार हजार पुस्तकांची लायब्ररी. यासोबत व्याख्याने देण्याची आवड, विविध कार्यशाळांचे आयोजन, त्यामधून मिळणारा मनाला उभारी देणारा प्रतिसाद. सोबतच लिखाणाची आवडवर्तमानपत्रातील कॉलम..त्यावरच्या प्रतिक्रीया..वाढत जाणारी वैचारिक उंचीयशाची ही परीमाणे संपत नाहीत तरनियमीत केला जाणारा व्यायाम..त्यासाठी विकत घेतलेली इंपोर्टेड सायकल..त्याचे २१ गेयर्स आणि गावातला चढाव चढताना अजिबात त्रास होत नाही हे मोठेपण..बाप म्हणून भूमिका वठवताना देखील मुलांना जीवनाचा आनंद घ्यायला शिकविणे..पावसात भिजवत नेऊन एका हातात चहा एका हातात समोसा असा आनंद घ्यायला लावणारा प्रेमळ बापवगैरे वगैरे वगैरेआपल्या भुमिकांबद्दल आपण सांगत सुटलेले असतोआणि अचानक सख्याच्या चेहेऱ्यावरचे ते मंद स्मीत आपल्याला या आत्मस्तुतीवचनांच्या प्रवासात एकदम थांबवतेआपण भानावर येतोत्याच्या हसण्यामागचा अर्थ कळल्यामुळे दचकून मागे वळून बघतो तो काय….

आपल्या मागचा आपण आपल्यासाठी बनविलेला सेट केव्हाच बदललेला असतो आणि आपले अंतरंग जाणणाऱ्या सख्याने तीस वर्षांपूर्वीचा सेट लावलेला असतो. आता त्याच्या हसण्याचा अर्थ कळतो..गेल्या अर्धा तासात त्याला सांगितलेल्या यशाच्या भूमिका त्या तीस वर्षांपूर्वीच्या सेटवर फारच अनैसर्गिक वाटायला लागतात….कारण बाराव्या वर्गात अनुत्तिर्ण झाल्यावरचे दुःखाश्रू त्याने बघितलेले असतात, शिस्तीच्या शिक्षकांचे अनेक पिरीएड बुडविताना त्यानेच सोबत केलेली असते, वाचन करण्यासाठी त्याच्या घरची पुस्तके मिळविण्यासाठी आपण केलेली धडपड त्याच्या स्मरणात असते, महाविद्यालयातील वक्तृत्व स्पर्धेमधे भाषणाचा प्रभावी शेवट त्यानेच लिहून दिलेला असतो आपण तो पाठ केलेला असतो..त्याला ते आठवत असते, कधीकाळी एका वहीच्या मागे केलेले तोडके मोडके लिखाण त्यानेच मोठमोठ्याने कट्ट्यावर वाचून आपण लिहू शकतो हे छोटेसे बळ आपल्यात निर्माण केलेले असते, त्यावेळी गावातील चढाव सायकलने चढताना आपण थकून जायचो तेव्हा त्याच्याच खांद्यावर पूर्ण भार देऊन त्याच्या जोरावर आपण तो चढ चढलेला असतोत्याला त्याच्या खांद्यावरचा तो भार अजूनही जाणवत असतोचहा सोबत गरमागरम समोसा खाण्याची सवय त्याच्याच सहवासात लागली असते परंतू एकच समोसा हातात असतो कारण त्यासाठी लागणारे अडीच रुपये त्याच्या आणि आपल्या पँटचे सर्व खिसे तपासून एकत्र झालेले असतात वगैरे वगैरे वगैरे….

या विश्वरंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका वठवून यशस्वी होणे हे तर प्रत्येकाच्या जीवनाचे ध्येय असतेअसायला हवेच परंतूया रंगमंचावरील विविध भुमिका वठविण्याच्या खऱ्या प्रवेशाआधी विंगेत उभे असताना आपल्या ह्रदयाची धडधड मनातील भिती शांतपणे खांद्यावर हात ठेऊन घालविणारा सखा कायम सोबत हवा….कारण रंगमंचाच्या झगमगाटामधे यशाच्या आकाशाला गवसणी घालतानाआपले पाय घट्ट जमिनीवर ठेवण्यासाठी तो आपल्याला सर्वाधिक मदत करतोकारण आपल्या जीवनातील सर्वोत्तम भुमिका आपण नाही तर आपल्यासाठी आपला सखा वठवत नसतो तर…. जगत असतो

 

No comments:

Post a Comment

Quote-Unquote@05.09.17 (Last Article)

   आधुनिक यंत्रजीवन                      “What shall I do now? What shall I do?” “I shall rush out as I am, and walk the street “With m...