Monday, 12 June 2017

My article published in Hindusthan daily under my column Quote-Unquote

Yet all experience is an arch wherethro'

Gleams that untravell'd world whose margin fades

For ever and forever when I move...

- Alfred Lord Tennyson


अल्फ्रेड लॉर्ड टेनीसन या अत्यंत प्रतिभाशाली कवीच्या जगभर प्रसिद्ध झालेल्या Ulysses या कवितेतील या सर्वाधिक लोकप्रीय ओळी ज्या माणसाच्या ठायी आवश्यक असलेल्या दुर्दम्य आशावादाच्या प्रतिक आहेत. युलेसीस या वयोवृद्ध राजाची कहाणी त्याच्याच तोंडून ऐकविताना टेनीसन या ब्रिटीश महाकवीने खरे तर प्रत्येक व्यक्तीने जगताना अंगीकारावे असे तत्व रुपकात्मक पद्धतीने मांडले आहे. उतारवयामधे शांतपणे बसून भौतिक सुख सोयींमधे लोळत पडण्याची संधी असूनही ती युलेसीसला नकोय. त्याला आस आहे नव्या सफरीची, नव्याच्या शोधात जाण्याची, नव्या जगाला बघण्याची, नव्या आव्हानांना पेलण्याची कारण त्याच्या मते जीवनाच्या शेवटच्या थेंबापर्यंत भरभरुन जगणे यानेच माणूसपण सिद्ध होते. दुर्दम्य आशावाद असलेल्या आपल्या ह्रदयाचे वेगळेपण त्याने ओळखले आहे. त्यामुळेच स्वाभीमानाने आपल्या जीवनाच्या नव्या सफरीवर जात असताना स्वाभाविकच त्याच्या मनात त्याच्या आयुष्याचा आलेख येतो. तो मांडत असताना नवनविन आव्हानांना पेलण्याची त्याच्या मनातील चेतना हेच त्याच्या यशस्वी आयुष्याचे मर्म आहे हे तो सांगतो. परंतू मिळविलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना यशाच्या त्या पायरीवर थांबून जाणे अशी अल्पसमाधानी वृत्ती त्याची नाही. तो जेता आहे आणि जेत्याची नजर कायम नव्या क्षितीजांच्या शोधात असते. या ओळींमधे युलेसीसचा तोच भाव मांडला आहे. तो म्हणतो की माझ्या आयुष्यात मिळविलेले विविध अनुभव हे माझे जीवनाचे संचित आहे जे एखाद्या भव्य कमानी प्रमाणे आहे त्या अनुभवांच्या कमानीखाली उभा राहून मी समाधान मानत असतानाच दूरवर मी अद्याप घेऊ शकलेल्या अनुभवांचे एक नवे जग लुकलुकत आहे. ते मला त्याच्याकडे येण्यास खुणावते आहे. कायम नव्याच्या शोधात रहाण्याची प्रबळ इच्छा मनात असल्याने मी त्या नव्या जगाच्या शोधात, त्या नव्या क्षितीजांच्या दिशेने झेपावतो...परंतू जसे जसे मी त्या नव्या जगाच्या जवळ जातो तसे तसे त्याच्या कक्षा दूर...खूप दूर...आणखी दूर जातात. एकंदरीत माझ्या प्रवासाला अंतिम स्थिती नाही...नव्याच्याही पलीकडचे आणखी नवे जग मला परत एकदा खुणावते आणि मी देखील जिद्दीने, थकता एका नव्या सफरीसाठी तयार होतो. जिवनातील विविध समस्यांना सामोरे जात असताना जगावे कसे? या जटील प्रश्नाचे इतके सोपे समर्पक उत्तर क्वचितच वाचायला मिळेल. टेनीसनच्या युलेसीसकडून प्रत्येकाने जगणे शिकावे म्हणजे मग मरण येत नाही म्हणून जगतोय असे वाक्य शक्यतोवर उच्चारण्याची पाळी येत नाही. कधीकधी काही विशेष परिस्थितींमधे प्रत्येकाला युलेसीस सारखे धैर्य दाखविता येणार नाही कदाचित...परंतू माणूस म्हणून जन्म मिळाल्याचे भाग्य ज्याला कळू शकते ती व्यक्ती जीवन युलेसीस प्रमाणेच जगण्याचा विचार करु शकते. युलेसीसचा हा नव्याच्या शोधार्थ निघण्याचा प्रवास भौतिक सुखाकडे जाणारा नाही हे देखील आपण लक्षात घ्यायला हवे. कारण भौतिक सुखे तर सारीच त्याच्या पायाशी लोळण घालत होती. परंतू तो निघालाय नव्या ज्ञानाच्या, नव्या अनुभवांच्या शोधात जे भौतिक सुखाच्या कितीतरी पलीकडचे माणूसपण सिद्ध करणारे आहे. अर्थात ज्ञानाचा असा वसा घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तीच खऱ्या अर्थाने जिवनाचा आनंद उपभोगतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे भौतिकतेच्या सहाय्याने मिळणारे सुख अत्यंत तदर्थ असते. नव्याच्या शोधार्थ निघालेला यात्री हा कोणत्याही क्षेत्रात आनंदच प्राप्त करतो...अगदी लताबाईने म्हणलेले एखादे गाणे गाताना नव्या पिढीतील सुरेल गायीका श्रेया घोषाल एखादी छान जागा घेते तेव्हा नवतेचा ध्यास असलेल्या प्रत्येकाला ती जागा मोहरवून टाकते. म्हणूनच ते एखादे सुरेल गीत लताबाईंच्या गायनासोबत संपत नाही तर त्याचा प्रवास सुरु राहतो....अगदी थेट आपणही एखाद्यावेळी छान मुड असताना ते गुणगुणतो आणि अचानक नवे काही गळ्यातून निघाले तर मनोमन खुश होतो. नव्याच्या शोधार्थ जाण्याचा हाच तर एक मोठा फायदा आहे...या प्रवासात थकवा नाही...आहे ती केवळ जीवनाची मनापासून उरभेट घेण्याची उर्मी आणि स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याची जिद्द... कारण एक सुंदर वाक्य वाचण्यात आले होते...स्वप्ने तेच बघतात ज्यांच्या ठायी त्यांना पूर्ण करण्याची क्षमता असते...निवृत्त झाल्यानंतरही युलेसीस सारखीच जिद्द ठेऊन जीवनाचा स्विकार केला होता आमच्या जोशी आजोबा-आजीने.

अमरावतीच्या प्रसिद्ध तपोवनची एक शाखा शेंदुरजना बाजार नावाच्या गावाला होती. त्या ठिकाणी कुष्ठरोग्याची सेवा करुन त्यांना नवे आयुष्य देणारा एक आश्रम उभारला होता आमच्या आजोबा-आजीने. शिक्षण विभागात मोठ्या पदावर कार्य करुन निवृत्त झाल्यावर त्यांनी तो निर्णय घेतला. मुलगी अमेरीकेला बोलावित असताना, मुलगा नागपूरला सर्व सुख सोयींनी युक्त घर देऊन रहायला बोलावित असताना आजोबा-आजीनी एका छोट्या गावात कुष्ठरोगी बंधु-भगिनींना सन्मानाचे घर मिळावे यासाठी एक संपुर्णपणे नवे जग आत्मसात करण्याचे ठरविले. युलेसीस नव्याच्या शोधात जगाच्या विविध भागांमधे जाण्यासाठी आतूर होता. आमचे जोशी आजोबा आजी आपल्याच आसपासच्या अश्या एका नव्या जगाच्या शोधात गेले होते जे जग आपल्यासारख्या अनेकांच्या विचारकक्षेतही नाही. कुष्ठरोग झाला म्हणून आपल्या जन्मदात्या आई वडीलांना घरातून काढून देऊन अक्षरशः रस्त्यावर मरण्यासाठी फेकून दिले जात होते...असल्या असंवेदनशील जगामधे एक नवा मार्ग शोधण्याचे कार्य जोशी आजोबा-आजींनी केले. आपल्या वाढत्या वयाचा सहानुभूती मिळविण्यासाठी उपयोग करुन किंवा आपण आपल्या तरुणपणी जिवनात खाल्लेल्या खस्तांचा वारंवार उल्लेख करुन आपल्या सभेवताली नकारात्मक वातावरण निर्माण करणारे अनेक ज्येष्ठ मंडळी दिसतात. कायम दुखरे चेहेरे ठेऊन जगामधील प्रत्येक गोष्ट कशी वाईट आहे, नवी पिढी कशी वाया गेली आहे आणि त्यांनी स्वतः जे केले तेच सर्वश्रेष्ठ होते अश्या प्रकारच्या वल्गना करत कटकटीचे आयुष्य जगणारे अनेक जण भेटतात. परंतू युलेसीस चे जिवन स्विकारण्याचे तत्व अनुसरलेले आमचे जोशी आजोबा जेव्हा सर्वप्रथम मला भेटले तेव्हा...बढीया बर्मुडा पँट, टी शर्ट आणि डोक्यावर हॅट घातली होती....गोरेपान सहा फुट उंचीचे आजोबा तोंडाने शीळ वाजवित फिरुन येत होते. आणि त्यांना बघून आजी म्हणाली... तो बघा आमचा यंग मॅन आला...असले खास जोडपे अत्यंत आनंदात कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी जीवन समर्पित करुन टाकते. त्या आश्रमातील मुलांसाठी लोणची घालण्यापासून तो तेथल्या मुलींच्या वेगवेगळ्या हेअर स्टाईल करण्यापर्यंत सगळी कामे आज्जी मोठ्या आवडीने करायची. मुलीच्या आग्रहास्तव मध्यंतरी चार महिन्यासाठी अमेरीकेला गेले असताना आणि तेथे त्यांना ऑलींपीक सारखा मेगा इव्हेंट प्रत्यक्ष बघण्याची संधी असताना केवळ या आश्रमातील मुलांची आठवण आली म्हणून एकाच महिन्यात परत आलेले आजी आजोबा अफलातूनच होते. नवे चौकटीच्या पलीकडचे काहीतरी करण्याची त्यांची जिद्द त्यांना जीवनाचा सर्वोत्तम आनंद प्राप्त करुन देत होती. कारण परमेश्वराकडून मिळालेल्या मानवी आयुष्याला मी सर्वप्रथम मनापासून स्विकारीन, त्यानंतर त्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी नव नविन संकल्पनांनी भारुन टाकीन आणि आयुष्याचा हा सुंदर प्याला शेवटच्या थेंबापर्यंत आनंदाने प्राशन करीन हे युलेसीसचे सच्च्या जिवनाचे तत्व जोशी आजी आजोबांना प्रेरीत करीत असावे...कारण युलेलीस या कवितेत टेनीसन ने लिहीलेले युलेसीस च्या तोंडचे एक वाक्य महत्वाचे ठरते.... I will drink my life to the lees अर्थात माझ्या जिवनाचा प्याला मी शेवटच्या थेंबापर्यंत मनापासून प्राशन करीन... असे जीवन जगायला हवे!!

 Lord Tennyson.

No comments:

Post a Comment

Quote-Unquote@05.09.17 (Last Article)

   आधुनिक यंत्रजीवन                      “What shall I do now? What shall I do?” “I shall rush out as I am, and walk the street “With m...