प्रा. बी.टी.देशमुख सर
पूर्ण....तत्पर....अचूक
मी इंग्रजी पद् व्युत्तर वर्गाचा विद्यार्थी असताना मला वेगवेगळ्या लेखकांचे लेखन अभ्यासण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली होती. इंग्रजी वाड़मयातील एक श्रेष्ठ दर्जाचा निबंधकार त्याच्या अप्रतिम वाक्यांच्या लिखाणामुळे माझ्या सदैव लक्षात राहीला, त्याचे नाव फ्रान्सिस बेकन. इंग्रजी वाड़मयात आद्य निबंधकार असा लौकीक असलेला बेकन त्याने लिहीलेल्या नेमक्या वाक्यांसाठी नेहमीच लोकप्रीय राहीला. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय असलेली त्याची अनेक वाक्ये प्रसिद्ध अवतरणे बनलेली आहेत. आम्हाला बेकन शिकविताना माझे गुरु प्रा. शिवाजीराव जोशी यांनी एकदा दिलेला एक विशेष संदर्भ मला आजही जसाच्या तसा आठवतो. फ्रान्सिस बेकनचा 'Of Studies' नावाचा निबंध शिकवताना त्यांनी तो दिला होता. आयुष्यभर कराव्या लागणाऱ्या अभ्यासाबाबत या निबंधात विस्तृत वर्णन करताना बेकन ने एक अप्रतिम वाक्य लिहीले आहे. Reading maketh a full man, Conference a ready man and Writing an exact man. इंग्रजी वाड़मयातील विविध विचारमौक्तीकांचा आपल्या जीवनाशी संबंध प्रस्थापित करुन त्याचे संदर्भ आपल्या सभोवताली शोधण्याची हातोटी प्रा. शिवाजीराव जोशी यांची होती. वरील वाक्याचा अर्थ समजावून सांगताना सर म्हणाले होते...या वाक्यातील अभ्यासा संदर्भात वर्णन करण्यात आलेल्या तीनही बाबी एकाच व्यक्तीच्या ठायी असणे ही बाब फार विरळ आहे. परंतू पुढे तुम्ही जर उच्चशिक्षण क्षेत्रात प्राध्यापक म्हणून कार्य केले तर मात्र या तिनही बाबींचा समुच्चय असलेल्या एका आदर्श व्यक्तीमत्वाच्या नेतृत्वाचा लाभ तुम्हाला घेता येईल....ते म्हणजे प्रा. बी.टी. देशमुख. पुढे सुदैवाने वरीष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा देण्याचा योग आला व त्या अनुषंगाने प्रा. जोशी सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रा. बी.टी. देशमुख सरांच्या नेतृत्वात कार्य करण्याची संधी देखील प्राप्त झाली. फ्रान्सिस बेकन या तत्वज्ञाने वर्णन केलेल्या या तीन महत्वाच्या गुणांचा परीचय बी.टी. सरांच्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास करताना पदोपदी झाला. बेकनच्या म्हणण्यानुसार वाचन माणसाला पूर्णत्व प्रदान करते, चर्चा ही माणसाला तत्पर बनविते व लिखाण हे माणसाला अचूकता प्रदान करते. अभ्यासाबाबतच्या या तीनही महत्वाच्या गोष्टी बी.टी. सरांनी त्याच्या जीवनाचा आधारच मानल्या आहेत. त्यांचा कुठेही उल्लेख करताना अभ्यासू आमदार असाच केला जाण्याचे कारण अभ्यास हा सरांच्या व्यक्तिमत्वाचा मूलाधार आहे. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाल्यास माझ्या थोडा है थोडे की जरुरत है या पुस्काच्या विमोचन सोहळ्याला सरांची आशीर्वादपूर्ण उपस्थिती लाभली होती. त्या समारंभाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. आदरणीय बी.टी. सरांचा अभ्यासाचा आवाका बघता असल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन अर्धा तास बोलणे ही तसे बघता त्यांच्यासाठी फारच साधी बाब आहे. त्यांच्या विविध विषयांच्या ज्ञानामधील थोडेसे विचारधन मांडूनही सरांना ते अध्यक्षीय विवेचन फारच प्रभावी करता आले असते. परंतू सहज करुन टाकणे हा बी.टी. सरांच्या अभ्यासपूर्ण प्रक्रीयेत न मोडणारा भाग असल्याने या समारंभापूर्वी मी त्यांना निमंत्रण द्यावयास गेलो तेव्हा त्यांनी मला पुस्तकाची प्रत अभ्यासासाठी मागून घेतली. एका प्रदीर्घ विचारक्षम प्रक्रीयेला आयुष्यभर पार पाडणाऱ्या एका विचारी व चिंतनशील व्यक्तीमत्वाचे धनी असलेले बी.टी. सर मला अभ्यासासाठी प्रत मागत होते. शिक्षकाने प्रत्येकवेळी वर्गात जाताना तयारी करावी हा अध्यापनाचा मुलभूत नियम सरांनी आयुष्यभर जोपासल्याचे ते द्योतक होते. माझ्या पुस्तकातील विविध लेखांचे वाचन नव्हे तर अभ्यास करुन त्या दिवशी सर जे बोलले ते उपस्थितांपैकी प्रत्येकाच्या आजही स्मरणात आहे. फ्रान्सीस बेकन च्या उक्तीनुसार वाचनाने मनुष्याला पूर्णत्व येते. बी.टी. सर अजूनही किमान तीन ते चार तास रोज वाचन करीत असावे असा माझा कयास आहे. त्यांच्याशी सहजही बोलताना ताज्या घडामोडींमधील तसेच सध्याच्या विधीमंडळातील, शासन निर्णयांमधील संदर्भ ऐकून ही बाब स्पष्ट होते. वाचन करीत असताना देखील फ्रान्सीस बेकनला जे अपेक्षित होते तसे वाचन सर करतात कारण त्या वाचनामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्वाच्या निर्णयांच्या बाबतीत सरांचे मत सर्वदूर ग्राह्य धरले जाते. बी. टी. सरांनी सांगितले म्हणजे तसेच असेल इतका विश्वास निर्माण होण्यामागे सरांचे प्रचंड वाचन व त्या वाचनासोबतच त्यांनी केले स्वतःचे चिंतन यामुळे सरांच्या विचारांना सर्वदूर स्विकार्यता आहे. शिवाय बी.टी. सरांचे वाचन हे केवळ शिक्षण क्षेत्राशी संबंधीत नाही तर सर्वच विषयांना स्पर्श करणारे आहे. दै. हिंदुस्थानच्या दिवाळी अंकाच्या विमोचन प्रसंगी सरांनी मांडलेली द्वैत आणि अद्वैताची संकल्पना ज्ञानेश्वरीचा आधार स्पष्ट करते आणि त्यावरुनच सरांच्या वाचनाचा आवाका कळतो. व म्हणूनच बेकनच्या म्हणण्यानुसार प्रगल्भ वाचनामुळे सरांच्या व्यक्तीमत्वाला एक प्रकारचे आदर्श पूर्णत्व प्राप्त झाले आहे. वाचनासोबतच चर्चा माणसाला तत्पर बनविते असे बेकन म्हणतो.
अभ्यासपूर्ण चर्चांच्या बाबतीत तर बी.टी. सर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. असे अनेक वेळा सांगितले जायचे की विधीमंडळात बी.टी. सरांचा प्रश्न असेल तर मंत्रीमहोदयांना सतर्क रहावे लागे व अभ्यास करुन तयारीनीशी सभागृहात यावे लागे. ही बाब विधीमंडळाच्या अनेक प्रतिवेदनांवरुन सहज लक्षात येऊ शकते. वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत सरांनी घडवून आणलेली चर्चा व त्या चर्चांच्या माध्यमातून सरांच्या विषय मांडणीची तत्परता आश्चर्यकारक आहे. बरेचवेळा बी.टी. सर केवळ प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबतच बोलतात व त्यांचे वर्तुळ त्याच विषयापुरते सीमित आहे असे बोलले जाते. परंतू वाचन न करता किंवा उथळपणे असली वक्तव्ये करणाऱ्या मंडळींनी प्रा. बी.टी. सरांनी पाण्याच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांवर घडवून आणलेल्या चर्चांचा अभ्यास करावा. चर्चांमधून माणसाला अनेक दृष्टीकोन अनुभवायला मिळतात आणि सोबतच चर्चेत सहभागी व्हायचे असल्यास विषयाच्या बाबतीत तत्पर रहावे लागते हा बेकनचा अभ्यासाबाबतचा नियम देखील सरांनी तंतोतंत पाळला. या दोन महत्वाच्या गुणांसोबतच अचुकता हा तर बी.टी. सरांच्या जीवनाचा आधार राहीलेला आहे. माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सरांनी सहजच सांगितले की त्यांच्या वर्गात विद्यार्थ्यांनी वेळेवरच आले पाहीजे हा त्यांचा दंडक होता आणि तो नियम त्यांनी स्वतः देखील संपुर्ण सेवेमधे पाळला. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते की मी जर वर्गात शिकवायला एक दिवस देखील उशीरा आलो तर मी तुम्हाला वर्षभर वर्गात केव्हाही प्रवेश करु देईन....परंतू सरांच्या अचूकतेमुळे ती संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नाही. लिखाण हे माणसाला अचूक बनविते हा बेकनचा अभ्यासाबाबतचा सिद्धांत तर सरांच्या जीवनाचे ब्रीद आहे.
अनेकवेळा सरांच्या बोलण्यातून यायचे की बोललेले तरी एखाद्यावेळी नाकारता येईल किंबहुना मला तसे म्हणायचे नव्हते व ऐकणाऱ्यांनी चुकीचा अर्थ घेतला अशी सारवासारव करता येईल परंतू लिहीलेले मात्र बदलत नसते आणि म्हणून जे काही लिहायचे ते अचूकच लिहायला हवे. यासाठी सरांनी आयुष्यभर फार परीश्रम घेतले व त्यामधूनच अत्यंत अचूक लेखन करणे हे सरांच्या अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्वाचे सर्वात श्रेष्ठ लक्षण आहे. एखादा ठराव, एखादा प्रस्ताव किंवा एखादा नियम किंवा एखादा मसुदा जर बी.टी. सरांनी लिहीला असेल तर त्याची बांधणी ही अनेकदा विचार केल्यानंतर झालेली आहे, त्याच्या विविध अर्थांचे पैलू तपासण्यात आलेले आहे आणि हा अचूकच आहे ही खात्री प्रत्येकाला वाटावी ही सरांच्या लेखणीची ताकद आहे. काही वर्षांपूर्वी शिक्षकाच्या विविध मागण्यासाठी झालेल्या संपादरम्यान सरकारशी बोलणी सुरु असताना त्या अंतीम मसुद्यामधील एका एका शब्दासाठी बी.टी. देशमुख सरांनी केलेला संघर्ष ऐकण्याचे भाग्य आम्हा नव्या पीढीच्या शिक्षकांना मिळाले आहे. लिखाणातील अचूकता हा नेहमीच सरांच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय राहीलेला आहे. म्हणूनच त्यांनी केलेल्या लिखाणातून अनेक हितोपयोगी मसुदे तयार झाले ज्याचे चांगले परीणाम अनेकांना लाभदायी ठरलेले आहेत. फ्रान्सीस बेकन या निबंधकाराने सोळाव्या शतकात अभ्यासासंबंधी केलेल्या तत्वांना हुबेहुब आपल्या जीवनात अनुसरुन एक तपस्वी व्यक्तीमत्व आपल्याला मार्गदर्शन करते हे फार मोठे भाग्य मानावे लागेल. वाचनातून आलेली पूर्णता, चर्चांमधून आलेली तत्परता व लिखाणातून साध्य केलेली अचूकता अश्या खऱ्या अभ्यासाच्या तीनही सद्गुणांचा मुलाधार असलेले तपस्वी जीवन आदरणीय बी.टी. देशमुख सर जगले आहेत आणि भविष्यातही अनेक दिवस ते सक्षमतेने मार्गदर्शन करत राहतील याबाबत खात्री वाटते.
अश्या एका अभ्यासू व्यक्तित्वाचा गौरव त्यांच्याच सारखे अभ्यासू व्यक्तीत्व स्व.डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या ज्ञानयोगी पुरस्काराने व्हावा हा एक अपूर्व योग आहे. एका ज्ञानयोग्याच्या नावाने एका ज्ञानमहर्षीला दिला जाणारा हा पुरस्कार खऱ्या अर्थाने परस्परांना गौरवांन्वित करणारा आहे. हा अपूर्व सोहळा याची देहा याची डोळा बघण्याचे भाग्य आपल्याला लाभते आहे हे आपले पूर्वसंचितच म्हणावे लागेल. आदरणीय बी.टी. देशमुख सरांचे या प्रसंगी हार्दिक अभिनंदन व नमस्कार. त्यांच्या प्रेमळ सहवासाचा व अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ सदोदित मिळत रहावा हीच मनोकामना.
-डॉ. अविनाश मोहरील
प्राचार्य, महिला महाविद्यालय, अमरावती
संवाद: ९४२३१२३९०६
No comments:
Post a Comment