Two Roads Diverged in a wood
I took the one less travelled by
And that has made all the difference...
- Robert Frost
रॉबर्ट फ्रॉस्ट या अमेरीकन कवीच्या The Road Not Taken या कवितेतील या ओळी जीवनातील यशस्वीतेचे मर्म अतिशय अचूकपणे मांडतात. आपले जीवन जगत असताना अनेकवेळा मार्ग निवडण्याच्या संभ्रमावस्थेमधे आपण अडकलेले असतो. ही स्थिती मोठी विचित्र असते. अशी स्थिती अनुभवण्यासाठी वयाचे बंधन नसते. दहावीनंतर कोणते करीयर निवडायचे या संभ्रमावस्थेमधे असलेला एखादा बालक, नोकरी मिळवित असताना समोर आलेल्या दोन संधींपैकी नेमकी कोणती निवडावी हे न समजल्याने गोंधळून गेलेला युवक किंवा निवृत्तीपश्चात आपल्या गावी रहावे की मुलांकडे जावे या विवंचनेत असलेला एखादा वृद्ध या सर्वांना योग्य मार्ग निवडीबद्दलच्या संभ्रमावस्थेचा सामना करावा लागतो. अश्या संभ्रमावस्थेमधे योग्य निर्णय करण्याबाबत नेमके काय केल्या जाऊ शकते याचेच वर्णन या वरील ओळींमधे रॉबर्ट फ्रॉस्टने केलेले आहे. समजातील प्रतिष्ठीत यशवंत नेमके काय करतात याबद्दल सामान्य माणसाला नेहमीच कुतुहल असते. यशस्वी माणसाच्या जीवनाच्या गाथा अनेकवेळा वाचल्या जातात किंवा सांगितल्याही जातात. आयुष्यात यश मिळविण्यासाठी त्यांनी काय कष्ट घेतले किंवा कश्या प्रकारची मेहनत घेतली इत्यादी बाबी सामान्य व्यक्तींना कायमच प्रेरणादायी ठरतात. परंतू त्यांच्या यशाचे मुलभूत सूत्र काय हे जर विचारण्यात आले तर मात्र या वरील कवितेच्या ओळी ते सूत्र स्पष्ट करतात. कायम दोन मार्ग आपल्यासमोर असतात आणि त्या दोनपैकी एक मार्ग निवडायचा असतो. दोन्हीपैकी कोणत्याही मार्गावर जाऊन बघणे अशी संधी बरेच वेळा नसते. अश्यावेळी साधारणपणे इतर लोकांनी निवडलेला मार्ग स्विकारुन पुढे जाण्याचा निर्णय सामान्यांकडून केला जातो. या मार्गावरुन मार्गक्रमण करुन सामान्य पद्धतीचे यश प्राप्त होऊ शकते. परंतू दैदिप्यमान यशाचे धनी मात्र अश्या जोडमार्गावर उभे राहून संभ्रमावस्थेच्या बिंदूवर मार्गनिवडीचा निर्णय करताना अतिशय वेगळा विचार करतात. ज्या मार्गावरुन फार कमी लोक गेलेले आहेत तोच मार्ग ते निवडतात आणि हाच त्यांचा निर्णय त्यांचे आणि त्यांच्या जीवन जगण्याच्या मुल्यांचे वेगळेपण सिद्ध करतो. कमी लोकांनी निवडलेला मार्ग निवडूनच ते दैदिप्यमान यशाच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतात. मार्ग निवडीच्या निर्णय क्षमतेचे वेगळेपणच त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवते. अश्या वेगळेपणाचे धनी आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रवासात अनेकवेळा भेटतात. अनेक यशस्वी लोकांच्या मार्गनिवडीच्या गाथा आपल्याला विविध पुस्तकांच्या माध्यमातून ठाऊक असतात परंतू कधीकधी सामान्य वाटणारे लोक देखील असामान्य पद्धतीचे धैर्य दाखवितात आणि त्यांच्या ठायी देखील तिच विलक्षण मार्गनिवडीची क्षमता असते. मला आठवते माझी एक विद्यार्थिनी...सोनाली.
बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दोन दिवस आधी सोनालीचे वडील एका भिषण अपघातात मृत्यूमुखी पडले. एका खाजगी कंपनीत नोकरीला असलेले तिचे वडील अचानक सोडून गेल्याने जो धक्का त्या परीवाराला बसला त्याचा अंदाज आपण करु शकतो. परंतू त्या धक्क्यातून सावरुन बारावीची परीक्षा पार पाडेपर्यंत त्या परीवाराला आणखी मोठे धक्के बसले. सोनालीच्या वडीलांनी साधारण पंधरा लक्ष रुपयांचे कर्ज करुन ठेवले होते आणि ते कर्जदार जेव्हा दारावर येऊन उभे राहीले तेव्हा मात्र तिचा आणि तिच्या आईचा परीक्षेचा काळ सुरु झाला. आतापर्यंत जगण्याची मध्यमवर्गीय चौकट सांभाळून समाजात वावरत असताना अचानक दारी उभे राहीलेल्या या नव्या संकटाने दोघी मायलेकी बावरुन गेल्या. वडील गेल्यानंतर सहानुभूती दाखविणारे आता मात्र टाळू लागले किंवा बघ्याच्या भुमिकेत गेले. मला जर पैसे देण्याची हमी दिली नाही तर एक दिवस मी तुमच्या घरातील सामान घेऊन जाईन अश्या पद्धतीची धमकी देऊन आणि तोंडातील पान त्या दोघींसमोर त्यांच्याच दारात थुंकून एक कर्जदार जेव्हा निघून गेला तेव्हा त्या दोघी एका खोलीत एकमेकींना बिलगून खूप रडल्या. सारे जग आपल्या विरोधात गेले की काय असे त्यांना वाटू लागले. काय करावे हे त्यांना सुचतच नव्हते. निर्णय घेण्याची संभ्रमावस्था...रॉबर्ट फ्रॉस्टने वर्णन केल्यागत त्यांना अनुभवावी लागली. एक मार्ग होता..सरळ गाशा गुंडाळून मामाकडे निघून जायचे. या परीस्थितीपासून पळून जायचे. साधारणपणे स्विकारला जाणारा मार्ग. साधारणपणे मध्यमवर्गीय कुटुंबांमधे लोक काय म्हणतील ही भावना जास्त तीव्र असल्याने नवा मार्ग सहजासहजी डोक्यात येत नाही. पण त्या मायलेकींनी त्या दिवशी रात्री एक अभूतपूर्व निर्णय घेतला. ज्या चौकटीमधे त्यांचे जगणे सुरु होते त्या चौकटीच्या दृष्टीने तो फारच वेगळा निर्णय होता. बरेचवेळा आपल्या चौकटी देखील लोकांच्या मतानुसार ठरलेल्या असतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यांचे निर्णय सामान्यपणे सर्वांसारखेच असतात. मार्ग निवडण्याचा वेगळेपणा फार कणखरतेने स्विकारावा लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरासमोर त्या दोघींनी एक टेबल मांडला आणि जवळ असलेल्या काही पैश्यामधून पालेकर कंपनीच्या ब्रेड टोस्ट मांडून त्याची विक्री सुरु केली. त्या सोबत एका पिशवीमधे त्या ब्रेड व टोस्ट भरुन सोनाली त्यांच्या परीसरातील प्रत्येक घरी जाऊन आली व तुम्हाला लागत असतील तर उद्यापासून मी घरपोच आणून देईन असे सांगून आली. तो पहिला दिवस सोनाली आणि तिच्या आईसाठी फार त्रायदायक होता. शरीरापेक्षा मनाला होणाऱ्या वेदना ज्या सभोवतालच्या लोकांच्या नजरांमधून त्यांना होत होत्या त्याला सिमा नव्हती. त्या दोघींच्या दुर्दैवाने त्यातील जास्तीत जास्त नजरा या कुचेष्टा करणाऱ्याच होत्या. परंतू आधल्या रात्री त्या दोघींनी एकमेकांचे हात घट्ट धरुन या सर्व भावनांनी खचून न जाता त्यांच्या मध्यामवर्गीय चौकटीत फार जास्त लोकांनी न स्विकारलेला मार्ग निवडण्याचे पक्के केले होते. त्या रात्री त्यांनी केलेला निग्रह रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेतील शेवटची ओळ सिद्ध करणारा ठरला. कमी लोक जातात त्या मार्गाची निवड केल्यानेच जो मोठा फरक जीवनात पडणे कवीला अपेक्षित आहे तसेच काहीसे या दोघी मायलेकींच्या बाबतीत झाले. या वेगळ्या मार्गाच्या निवडीमुळे त्यांच्या त्या प्रयत्नाबद्दल केली जाणारी कुचेष्टा हळूहळू कौतुकामधे परावर्तीत व्हायला लागली. काही दिवसातच त्या छोट्याश्या टेबलवरील व्यवसायाचे एका छोट्या दुकानामधील व्यवसायात परीवर्तन झाले. दुकानामधे माल वाढला. आता सोनालीला सकाळी आणि सायंकाळीही माल पोहोचविण्यासाठी जावे लागे. इतक्या विपरीत परीस्थितीमधे परीक्षा दिल्यानंतरही सोनालीचे बारावी योग्य पद्धतीने पूर्ण झाले होते व पुढील शिक्षण देखील सुरु होते. वेगळ्या मार्गावरचा हा प्रवास त्या दोघींना मानसिकदृष्ट्या अतिशय थकविणारा होता. परंतू मार्ग निवडल्यानंतर मागे फिरायचे नाही हे देखील त्यांनी त्याच रात्री ठरविले होते. आज या घटनेला साधारण दहा वर्षे झाली आहेत. आज सोनाली विवाहित असून तिची आई तिच्याजवळ पुण्याला स्थायीक झालेली आहे. सोनाली एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करते. मागच्या महिन्यात मला भेटायला आली तेव्हा सारे काही सांगताना आता परिस्थिती चांगली असली तरी त्या काळी जड पिशव्या उचलून उचलून हातावर पडलेले व्रण तसेच आहेत असे म्हणून तिने तिचे तळहात मला दाखविले. मला ती म्हणाली, सर त्यावेळी जर तो वेगळा मार्ग स्विकारला नसता तर मामाच्या आश्रयाने राहता आले असते परंतू आजसारखे स्वाभीमानाचे जिणे नशिबी नसते. तो एक वेगळा मार्ग निवडला आणि त्यानेच सारा बदल घडून आला...
सोनालीच्या मागे अदृष्य स्वरुपात उभा असलेला रॉबर्ट फ्रॉस्ट माझ्याकडे बघून हसत होता. त्याच्या त्या हसण्यातून तो मला सांगत होता...बघ! माणूस आणि त्याच्या मूळ भावना या जगाच्या पाठीवर सारख्याच आहेत...त्या बदलत नाहीत. मला नमस्कार करुन सोनाली निघाली..मी मुद्दाम हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. माझ्या तळहाताला झालेल्या तिच्या तळहातावरील व्रणांचा स्पर्श मला तिच्या वेगळा मार्ग निवडण्याचे वेगळेपण जाणवून गेला..जो मी विसरू शकलेलो नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला जीवनात निर्णय दुभाजकांवर उभे रहावे लागणार आहे. रॉबर्ट फ्रॉस्ट आपल्याला निश्चित मदत करेल.
Nicely interpreted
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete