स्वर सामर्थ्य
“Could I revive within me
Her symphony and song,
To such a deep delight ‘twould win me,
That with music loud and long,
I would build that dome in air”
― Samuel Taylor Coleridge / Kubla Khan
इंग्रजी वाड़मयाच्या रोमॅन्टीसीझम या फार गाजलेल्या कालखंडातील एक अतिशय प्रतिभावंत व कल्पनारम्यतेचा अनभिषिक्त सम्राट मानल्या गेलेला कवी म्हणजे एस.टी.कोलरीज. कल्पनाशक्तीचा जेवढा समर्थ वापर कोलरीजने त्याच्या कवितांमधे केला तेवढा क्वचितच कुठल्या कवीने केलेला आपल्याला आढळतो. या कल्पनाशक्तीच्या आधारेच त्याने त्याच्या कवितांमधे अतीमानवीय संकल्पनांचा देखील उपयोग केलेला होता. परंतू मानवीय व अतीमानवीय यामधे अत्यंत सूक्ष्म रेषा ठेऊन या दोन्ही बाबींची मानसिक परीपूर्तता मानवी जीवनाचा संदर्भ घेऊन मांडण्याचे कसब त्याला साधले होते. खरे बघता मानवी जीवन हे वेगवेगळ्या अतीमानवीय संकल्पनांनी वेढलेले असते. या अतीमानवीय संकल्पना मानवी जीवनास आधारभूत होण्यामागील मानसशास्त्रीय कारण देखील कोलरीजने त्याच्या एका विस्तृत निबंधामधे स्पष्ट केलेले आहे. हे कारण इंग्रजी साहित्यात Willing suspension of disbelief या संज्ञेद्वारे प्रसिद्ध आहे. मानवी जीवनाचा आधार म्हणजे परमेश्वर ही अतीमानवीय संकल्पना देखील याच मूळ सूत्राद्वारे प्रस्थापित झालेली आहे. मानसिक आधारासाठी स्वखूशीने अविश्वासाचा केलेला त्याग असे त्यास म्हणता येईल. एखाद्या मंदिरात दगडाच्या मूर्तीवरील वैज्ञानिक तर्कामुळे निर्माण होणारा अविश्वास त्यागणे व त्या मुर्तीस परमेश्वर मानून आणि त्याची आराधना करुन आत्मविश्वास प्राप्त करणे अशी ती संकल्पना आहे. कोलरीजच्या सर्व कवितांमधे या संकल्पनेच्या आधारे त्याने आपल्याला दिःग्मुढ करुन टाकणारी कल्पनाचित्रे साकारलेली आहेत. Kubla Khan या कवितेमधेही त्याने असेच चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला व एक अभूतपूर्व कविता साकारत असतानाच त्याच्या काव्यरचनेच्या प्रक्रीयेत बाधा निर्माण झाली व त्यानंतर त्याला ते स्वप्न पूर्णच करता आले नाही. त्यामुळे ही कविता अर्धवट स्वरुपातच उपलब्ध होऊ शकली. परंतू या काहीच ओळींमधे कोलरीजच्या कल्पनाशक्तीची चुणूक आपल्याला जाणवू शकते. या वरील ओळींमधे त्याने संगीताच्या प्रचंड सामर्थ्याचे वर्णन केलेले आहे. या कवितेचे निर्मीती करताना कोलरीजने एका विशाल साम्राज्याचे स्वप्न बघितले होते व त्या साम्राज्यातील भव्य इमारतींचा उल्लेख तो करीत होता. एक अतिभव्य घुमट असलेल्या इमारतीचे वर्णन तो करीत असताना प्रत्यक्षात ती इमारत समोर नसली तरी त्या इमारतीचे निर्माण करण्याकरीता त्याने एका वेगळ्याच गोष्टीच्या क्षमतेचा आधार घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
कोलरीजच्या स्वप्ननगरीत वाद्यावर संगीत वाजविणारी एक देवतास्वरुप तरुणी जेव्हा संगीताची निर्मीती करते तेव्हा ते संगीत कोलरीज स्वतःच्या शरीराच्या रोमारोमात दिव्यप्रकाशागत अनुभवू इच्छितो आहे व त्या संगीताद्वारे आत्मिक समाधान प्राप्त करुन तो त्याचे सामर्थ्य स्वतःच्या प्रतिभेशी जोडतो आहे. संगीताच्या त्या अतीमनावीय सामर्थ्याच्या बळावर तो प्रचंड मोठा घुमट असलेला महाल हवेमधे निर्माण करु इच्छितो. अर्थात तो महाल देखील कोलरीजच्या कल्पानाशक्तीच्या अत्युच्च दर्जाचा नमुनाच होय. परंतू हा महाल या प्रसंगी कोलरीज संगीतामधे असणाऱ्या दैवी व अतीमानवीय सामर्थ्याच्या बळावर निर्माण करु इच्छीतो. या काव्यपंक्तींद्वारे कोलरीजने संगीताचे व स्वरांचे सामर्थ्य अधोरेखीत केलेले आहे. या निमीत्ताने कोलरीज या सामर्थ्यवान कवीने मानवी जीवनामधील संगीताचे महत्व देखील सांगण्याचा प्रयत्न केलाय. संपूर्ण समर्पणाने सादर केलेले संगीत व त्यामधून निर्माण झालेले स्वर आपल्याला अद्वितीय आनंदच देतात. अश्या समर्पित संगीताचा अनुभव आपल्याला कधी कधी सहजच मिळून जातो. असल्या अनुभवासाठी फार नावाजलेला संगीत कलावंत हवाच असेही नाही किंवा एखादा मोठ्ठ्या संगीत समारोहातील लाखो रुपये बिदागी घेऊन सादर करण्यात आलेली मैफीलच असायला हवी असेही नाही… किंबहुना इव्हेंट म्हणून सादर होणाऱ्या संगीत सादरीकरणामधे कधी कधी आपल्याला अपेक्षित स्वरानंद प्राप्त होत नाही परंतू मोठे तिकीट काढले असल्याने मान हलविणे क्रमप्राप्त ठरते. याऊलट कोणताही अभिनिवेश न बाळगता शांतपणे स्वरसाधना केलेला एखादा ग्रामस्थ आपल्याला अद्वितीय स्वरानुभूती देऊन जातो… असा एक रोमांचित करणारा अनुभव माझ्या कायम स्मरणात राहीला आहे.
सेमाडाहवरुन सलोन्याला जाण्यासाठी आम्ही सगळे युथ होस्टेलर्स निघालो तेव्हा आमच्या ग्रुप लिडरने सूचना दिली होती की आजचा ट्रेक कठीण आहे. त्या ट्रेकमधे बरेचवेळा रस्ता विसरण्याची शक्यता असल्याने एक गाईड सोबत घेतला होता. चालताना आमच्या लक्षात आले की त्याच्या जवळ एक लाकडाची बासरी आहे. आम्ही सारेच जण संगीतप्रेमी असल्याने सर्वांनी त्याला बासरी वाजविण्याचा आग्रह केला. नंतर वाजवून दाखविन असे म्हणून त्याने बासरी वाजविणे टाळले. आम्ही देखील आमच्या समुह गीतांमधे रममाण झालो व त्यामुळे आम्हाला त्याच्या बासरीचा विसर पडला. डोंगर दऱ्या चढत उतरत आमचा ट्रेक सुरु होता. ग्रुप लीडरने सांगितल्याप्रमाणे चांगलाच थकवा आणणारा तो ट्रेक होता. शेवटचा पहाड चढल्यावर मात्र आम्ही सारे पार थकून गेलो होतो. सायंकाळ होत आली होती. तो पहाड उतरला की ट्रेक संपणार होता. आम्हाला नेणारी गाडी तेथे हजर होती. परंतू आम्ही सारे खूप जास्त थकल्यामुळे त्राण गेल्यागत पहाडावर एका झाडाखाली बसलो. चालताना बरीच गाणी जोरजोरात म्हणल्याने आणि नेहमीप्रमाणे खूप खूप हसल्याने सर्वांचे आवाज बसले होते. सायंकाळच्या त्यावेळी सर्वांनी शांतपणे त्या विस्तीर्ण निसर्गाचा सूर ऐकत स्तब्धपणे बसणेच पसंत केले. आमच्यापैकी कुणीही बोलत नव्हते. शरीर संपूर्णपणे थकलेले होते. त्या निसर्गमयी संध्याकाळी अचानक आमच्या त्या गाईडने त्याच्याजवळची बासरी काढली. कदाचित तो याच क्षणांची वाट बघत होता. मला त्याने जो प्रश्न विचारला तो ऐकून मी चाट पडलो. त्या आमच्या ग्रामस्थ वाटाड्याने मला काय विचारावे? बोला…कोणता राग ऐकणार? शास्त्रीय संगीताचा राग!! त्या सुंदर सायंकाळी माझ्या तोंडून स्वाभाविकपणे निघाले…मारवा!!
त्यानंतर पुढील वीस मिनीटे त्या निःशब्द निसर्गाच्या सान्नीध्यात आम्ही सर्वांनी मारव्याची जी सुरावट ऐकली ती केवळ अद्भूत होती. अत्यंत गोड असा हा राग ज्याचा सुरेल स्वरविस्तार त्या कलाकाराने उलगडणे सुरु केले. रीषभ आणि धैवतावर होणारा ठहेराव अंगावर रोमांच उभे करीत होता. मुळातच सायंकाळचा हा राग सायंकाळची हुरहुर आणि हवीहवीशी वाटणारी प्रेम भावना निर्माण करणारा राग आहे. सायंकाळच्या थोड्या आनंदी व थोड्या खिन्न अश्या संमिश्र भावनांचे तरंग आमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात उमटू लागले.जवळपास वीस मिनीटे तो मारव्याचा स्वरविस्तार सुरु असताना अंगातून थकल्यामूळे निघून गेलेली शक्ती आश्चर्यकारकरीत्या परत येतेय असे आम्हाला वाटू लागले व एक प्रकारची सुखद चैतन्यमयी अनुभूती थकलेल्या शरीरीच्या प्रत्येक अंशाला रोमांचित करु लागली. मारव्याच्या त्या पवित्र आणि सहजपणे केलेल्या स्वरविस्ताराने शहरी झगमगाट व कृत्रीमतेपासून खूप दूर राहून संपुर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात घालविलेली ती सायंकाळ आमच्यापैकी सर्वांच्याच जीवनातील सर्वोत्तम सांयकाळ बनली. मारव्याचा तो मधूर स्वरविस्तार थांबला तेव्हा आम्हा सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. शास्रीय संगीत अजीबात न समजणाऱ्यांनाही त्या दिवशी शुद्ध, पवित्र आणि समर्पित संगीताचे सामर्थ्य जाणविले..डोळ्यात आपोआप गोळा झालेल्या आनंदाश्रुंमुळे…
कोलरीज योग्य बोलला होता…संगीताच्या सामर्थ्याने एक मोठा महाल देखील आसमंतात निर्माण करता येईल…त्याची अनुभूती प्राप्त होऊ शकेल. खऱ्या संगीताचे हेच तर स्वरसामर्थ्य असते ज्याचा आस्वाद प्रत्येक मानवाला अद्वितीय आनंद निर्मीतीसाठी घेता येऊ शकतो.
We were on the same trail last Sunday and no guide. So as it happened again explored some new vallies and gorges . In the end everything was lovely. Melghat still awakens awe in you and I just love it. A different Marwa everytime you visit. Your writing takes me again n again to that long lost path of English literature and its awesome experience, no doubt. Keep it up.
ReplyDelete