स्वातंत्र्य पहाट
Where the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth
Where tireless striving stretches its arms towards perfection
Where the clear stream of reason has not lost its way
Into the dreary desert sand of dead habit
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake
― Rabindranath Tagore
इंग्रजी वाड़मयातील कवी व लेखकांप्रमाणेच आपल्या देशातील काही कवींनी त्यांच्या इंग्रजी लेखनामुळे जागतिक किर्ती प्राप्त केलेली आहे. त्या यादीतील सर्वात शिर्षस्थ नाव म्हणजे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर. गुरुदेवांनी इंग्रजी भाषेत भाषांतरीत केलेल्या गीतांजली या काव्यसंग्रहाला १९१३ साली साहित्याचे नोबेल पारीतोषिक प्राप्त झाले. एकूण १०३ कविता असलेल्या या काव्यसंग्रहात गुरुदेवांनी वेगवेगळे विषय हाताळले त्यातीलल एक महत्वाचा विषय म्हणजे राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम. ज्यावेळी या कवितांचे गुरुदेवांनी लिखाण केले त्यावेळी आपला देश पारतंत्र्यात होता व त्या काळी गुरुदेवांनी स्वातंत्र्याचे एक सुंदर स्वप्न बघितले. पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट छायेखाली बळजबरीने निद्रीस्त केल्या गेलेल्या या भारतमातेला स्वातंत्र्याच्या पहाटे जागे व्हायचे आहे तर तो सूर्य कसा असावा व त्या स्वातंत्र्यसूर्याची किरणे ज्यावेळी माझ्या देशाच्या अणू रेणूला स्पर्श करतील देश त्यावेळी माझा देश कसा असावा याबाबतचे अत्यंत आदर्श स्वप्न म्हणजे गुरुदेवांची ही कविता..
आज स्वातंत्र्यदिनाच्या पहाटे गुरुदेव मला दिसले… पांढरी दाढी, नेहमीचा पोशाख आणि चेहेऱ्यावर तेच शांत व दैवी भाव… मला म्हणाले… थांब तुला कविता ऐकवितो…१९४७ साली आजच्याच दिवशी जेव्हा पहाटे या स्वतंत्र देशात पहिला सुर्योदय होईल तेव्हा माझ्या देशाने कसे असावे याबद्दलचे माझे स्वप्न या कवितेत आहे.. मला सांग जरा… सत्तर वर्षांनतर तरी तुम्ही सर्वांनी बनवलाय का माझ्या स्वप्नातला भारत? गुरुदेव विचारणार म्हणून मी जरा सरसावून बसलो…मनात खात्री होती…सत्तर वर्षात आपण एवढे तर निश्चित केले आहे.. पण जसजसे गुरुदेवांनी कवितेची एक एक ओळ वाचणे सुरु केले व प्रत्येक ओळीनंतर माझ्याकडून उत्तराच्या अपेक्षेत ते थांबू लागले तशी तशी माझी स्थिती बिकट होऊ लागली.
गुरुदेव: जेथे मस्तक अभिमानाने उंचावले असेल आणि मनात भयाचा लवलेशही नसेल अश्या स्थितीत… मी: मला तर माझ्या प्रार्थना मंदीरांमधेही जायला भिती वाटू लागलीय..मी परमेश्वराच्या चरणी लीन व्हायला जातो व तेथला सुरक्षा रक्षक मी दहशतवादी तर नाही ना या संशयाच्या नजरेने मला बघत असतो. नियमित घरी येण्याच्या वेळेपेक्षा माझ्या मुलीला पंधरा मिनीटेही उशीर झाला तर माझ्या मनात भितीचे काहूर उठायला लागते…रस्त्यावरुन भरधाव गाडी चालविणाऱ्या स्पीड बाईकर्सना बघून सायकलने शाळेतून मुलगा घरी सुखरुप येईपर्यंत त्याच्या आईचा जीव टांगणीला लागलेला असतो..या भयाच्या वातावरणात माझे मस्तक अभिमानाने कसे उंचावेल जेव्हा माझ्या आसपासचे जग मला बचैन करते आहे… गुरुदेव : जेथे ज्ञान मुक्त असेल आणि व्यावहारिक भिंतींनी जग तुकड्यांमधे विभागले गेले नसेल अश्या स्थितीत… मी: मला तर सत्तर वर्षांनंतर जातीव्यवस्था अजून बळकट व तीव्र झालेली दिसतेय. माणसाला माणूस नव्हे तर जातीने ओळखण्याची जुनीच पद्धत रुढ होतेय…धर्माचे तर कॉपीराईट असल्यागत लोक बोलू लागलेत. परंतू या चर्चांमधे सौहार्द नसून तीव्र विरोध हाच लोकसंग्रहाचा आधार बनलाय. माझ्या देशात ज्ञान देखील बंदिस्त आहे. राजकिय व्यवस्थांचा हस्तक्षेप ज्ञानाच्या क्षेत्रातही इतका वाढलाय की ज्ञानाचा उपयोग राजकीय व स्वार्थी विचार प्रसृत करण्यासाठीच केला जातोय.. गुरुदेव : जेथे शब्दांचा आधार केवळ सत्यच असेल… मी: मी तर गेल्या सत्तर वर्षात सत्याची नवी व्याख्या बनविली आहे. व्यक्तिगत फायदा करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन सत्य आणि असत्य यामधील फरक पूर्णपणे संपवून आम्ही त्याला नवे नाव प्रदान केलेय..प्रोफेशनॅलीझम. या नावाखाली स्वार्थ ही आमची सर्वोच्च प्राथमिकता बनली आहे. गुरुदेव : जेथे समर्पित कार्य करणारे अनेक हात प्रत्येक कामातील अचूकता साध्य करण्यासाठी खपत असतील.. मी: माझ्या देशात तर आम्ही सध्या अचूकता ही केवळ अर्थ कारणाचा भाग बनविली आहे. अर्थार्जनाच्या विविध संधी प्राप्त करणे हीच काय ती अचूकता आम्ही साधलीय.. अचूकता आणण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर सुरु केला परंतू त्याच्या वापरामधील अचूकता न साधल्यामुळे किंवा तशी मानसिकता तयार करु न शकल्याने केवळ गोंधळ उडतो..आम्ही हतबल होऊन जातो. गुरुदेव : जेथे तर्काचा पारदर्शी झरा मृत व कालबाह्य सवयींच्या वाळवंटात हरवला नसेल अश्या स्थितीत.. मी: तर्क? तो काय असतो? गेल्या सत्तर वर्षांमधे आम्ही विज्ञानाला जीवनाचा आधार बनविला परंतू अजूनही आपल्या देशात गणपती दूध पितात किंवा दर्ग्याजवळचा समुद्र अचानक गोड होतो व आम्ही उच्चविद्याविभूषित हातात दुधाच्या वाट्या घेऊन गणपतीला दुध पाजण्यासाठी किंवा हातात बाटल्या घेऊन समुद्राचे गोड पाणी भरायला रांगांमधे उभे राहतो. आमच्या जुनाट व कालबाह्य सवयींना आम्ही संस्कृती व परंपरा असली वजनदार नावे देऊन प्रभावीपणे रुढ करण्याचा प्रयास करीत आहोत. अजूनही ग्रहणाला अपशकुनी मानून आम्ही आमची कामे थांबवतोय व अजूनही अनेक अमानवीय प्रथा धर्माच्या कडवेपणाच्या आड खपविण्याचा प्रयास करतो.. अजूनही गुप्त धनाच्या आशेने स्मशानात जमीन आम्ही खणतोय आणि रस्त्याच्या मधोमध असलेले प्रार्थना स्थळ रहदारीच्या दृष्टीने हटवायचे असेल तर आमच्या भावना दुखावून आम्ही दंगली घडवून आणतो. कोणत्या तर्काबद्दल बोलता आहात आपण? गुरुदेव : जेथे विस्तृत होत जाणाऱ्या विचारांना व कार्यांना हे प्रभो, तुझे आशिर्वचन लाभेल.. मी: या प्रभूपर्यंत सामान्य माणसाला पोहोचविण्याची सोयच आम्ही ठेवलेली नाही. कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेली ही सर्व परमेश्वरांची निवासस्थाने आम्ही कॉर्पोरेट हाऊसेस बनविली आहेत. परमेश्वराच्या दर्शनाचे रेट ठरविलेले आहेत, त्याच्या ऑनलाईन बुकींगची सोयही केली आहे. या ठिकाणी होणाऱ्या करोडो रुपयांच्या टर्न ओव्हर वरुन आम्ही परमेश्वराची शक्ती ठरवतोय.. त्यामुळे आमच्या विचारांना विस्तृत करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हे प्रभो आम्ही तुला मोकळे ठेवलेलेच नाही. गुरुदेव : अश्या त्या स्वतंत्र व स्वर्गरुपी वातावरणात माझ्या देशात स्वातंत्र्य पहाट होवो… हे ऐकून काही सुचेनासे झाले… मी उत्तर देऊ थकलो नाही.
या शेवटच्या ओळीमधे गुरुदेवांनी व्यक्त केलेली इच्छा आपण गेली सत्तर वर्षे स्वतंत्रता दिवस साजरा करुन पूर्ण करु शकलोय? आजच्या दिवशी गुरुदेवांना स्मरुन हा प्रश्न प्रत्येक भारतीय नागरीकाने आपल्या मनाला विचारायला हवा… व अंतस्थ मनातून येणाऱ्या प्रामाणिक उत्तराला आधारभूत ठेऊन कर्तव्यपूर्ती करावी. भारत माता की जय!!
No comments:
Post a Comment