Sunday, 20 August 2017

Quote-Unquote @ 22.08.17

आत्म्यांचा भौतिक साक्षात्कार                      

 We then, who are this new soul, know 

Of what we are compos'd and made, 

For th' atomies of which we grow 

         Are souls, whom no change can invade. 

But oh alas, so long, so far, 

         Our bodies why do we forbear? 

They'are ours, though they'are not we; we are 

         The intelligences, they the spheres. 

We owe them thanks, because they thus 

         Did us, to us, at first convey, 

Yielded their senses' force to us, 

                                                  Nor are dross to us, but allay.                       

          ― John Donne / The Ecstasy 

इंग्रजी वाड़मयातील John Donne हा कवी metaphysical कवी म्हणून प्रसिद्ध आहे. इंग्रजी वाड़मयातील हा काव्यप्रकार अतिशय वेगळ्या प्रकारचा तर्कनिष्ठ विचारांना प्रसरित करणारा असे मानले गेले आहे. या काव्यप्रकारामधे भावनांसोबत तर्कांची जोडणी या कवितांना एकावेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. शब्दाच्या व्याख्येनुसार या कविता भौतिक जगताच्या पलीकडचा विचार मांडतात. परंतू भौतिक जगताच्या पलीकडचे विश्व साकारताना भौतिक जगताशी असलेला माणसाचा संबंध आणि मुळात पंचमहातत्वांनी बनलेले मानवी शरीर हे देखील मानवी अस्तित्वाचा महत्वाचा भाग आहे अश्या संकल्पना देखील जॉन डन या कवीने मांडल्या आहेत. म्हणूनच The Ecstasy या एका अप्रतिम कवितेमधे त्याने प्रेमासारखा अत्यंत तरल संपुर्णपणे भावनिक विषय तर्काचा आधार घेऊन सादर केलेला आहे. या प्रकारच्या कवींचे एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे ऐरवी केवळ भावनिक संवेदनांच्या आधारे मनाच्या तरंगावर स्वार होऊन समजले जाणारे विषय हे कवी तर्काच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारे मांडतात. विषयाकडे बघण्याची त्याची मांडणी करण्याची यांची पद्धत अतिशय वेगळी असते. या कवितेमधेही जॉन डनने एकमेकांवर निरातिशय प्रेम करणाऱ्या दोन प्रेमींमधील प्रेम व्यक्त केले आहे. परंतू ही metaphysical पठडीतील कविता असल्याने ही साधी प्रेमकविता राहता त्याला एका वेगळ्या तर्कशुद्ध पातळीवर जॉन डन पोहचवितो. प्रेम करणारे दोन प्रेमी एकमेकांचा हात धरुन एका तळ्याच्या काठी बसलेत अश्या नेहेमीच्या प्रेमकवितेच्या पद्धतीने ही देखील कविता सुरु होते परंतू त्यानंतर त्या प्रेमाचे आत्मिक स्वरुप मांडण्यासाठी जॉन डन ने अफलातून संकल्पना मांडली आहे. तो वर्णन करतो की एकमेकांचे हात धरुन ठेवलेल्या या प्रेमी जिवांच्या शरीरातून दोन आत्मे बाहेर पडतात एका उंचीवर जाऊन त्या दोन आत्म्यांमधे प्रेमाबद्दलचा त्याच्या शाश्वततेबद्दलचा संवाद सुरु होतो. या दोन्ही आत्म्यांमधील त्याचा किंवा तिचा आत्मा अशी ओळख देता येत नाही कारण शरीरे जमिनीवर असल्याने आत्म्याला स्वतंत्र ओळख उरतच नाही. शरीरे बदलू शकतात परंतू आत्मा बदलू शकत नाही त्यामुळे आत्मिक पातळीवरचे प्रेम हे सर्वश्रेष्ठच असते हा भौतिकते पलीकडील शाश्वतता व्यक्त करणारा विचार त्या आत्म्यांकडून मांडला जात असतानाच त्या आत्म्यांना खाली बसलेल्या त्या शरीरांची आठवण येते अचानक कवितेचा मुड बदलतो. तर्काच्या आधारे आत्मिक पातळीवरील प्रेमाचा भौतिकवादाशी जॉन डन ने जोडलेला संबंध आणि तो पटवून सांगण्यासाठी त्याने वापरलेली पद्धत खरोखरीच विलक्षण आहे

आत्म्यांचा एकमेकांशी संवाद सुरु असताना अचानक त्या दोन्ही आत्म्यांना जाणवते की आपल्यातील या अद्भूत प्रेमाच्या प्रथम प्रकटीकरणाला संपुर्णपणे ती दोन शरीरेच जबाबदार आहेत. जणू आपण बुद्धीमत्ता आहोत परंतू त्या बुद्धीमत्तेला शरीररुपाने साचेबद्ध केल्यासच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. त्याचप्रमाणे प्रेमाने अत्युच्च आत्मिक पातळी जरी गाठली असली तरी देखील त्याच्या भूतलावरील प्रगटीकरणाचा मार्ग मात्र शरीरांच्याच माध्यमातून असतो. हा तर्कपूर्ण विचार केवळ जॉन डन सारखाच कवी मांडू शकतो. आत्मिकतेची भौतिकतेशी त्याने लावलेली जोड फारच मोहक मनाला पटणारी ठरते. ते आत्मे म्हणतात की आपण शरीरांचे आभार मानायला हवे की त्यांनी त्यांच्या ठायी असलेल्या पंचतत्त्वांच्या आधारे सर्वप्रथम या प्रेमाच्या अनुभूतीचा आनंद घेतला. सर्वप्रथम त्यांच्याच माध्यमातून हे प्रेम व्यक्त झाले त्यानंतर ते आत्मिक पातळीवर प्रस्थापित झाले. त्यामुळे प्रेमासारखी अत्युच्च पवित्रतेची भावना देखील शरीराच्याच माध्यमातून किंवा आकर्षणातून सर्वप्रथम व्यक्त होते त्यात वावगे किंवा अनैसर्गिक अजिबात काही नाही असे जॉन डन ठामपणे सांगतो. एखाद्या तज्ञ मानसशास्त्रज्ञाने मांडावी अशी प्रेमाबद्दलची संकल्पना जॉन डन आपल्या कवितेतून मांडतो. ती एक स्त्री आहे तो एक पुरुष ही प्राथमिक स्वरुपात शरीराच्याच दृष्टीने विलग असलेली बाबच त्या दोघांमधील आकर्षणाला निस्सीम प्रेमाला कारणीभूत ठरते ही मुलभूत कल्पना नाकारता येतच नाही म्हणूनच प्रेम करणाऱ्यांचे आत्मे देखील प्रेम व्यक्त करणाऱ्या शरीरांचे महत्व जाणतात त्यांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या प्रेमाला कमी दर्जाचे किवा वासनामय वगैरे समजत नाहीत. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात असला विचार मांडण्याचे धाडस जॉन डन ने केले कारण अजूनही आपल्याला ते धाडसच वाटू शकते. माणसाच्या मूलभूत मानसशास्त्रीय चौकटींचा अभ्यास असलेला व्यक्ती मात्र आजही जॉन डनची संकल्पना अतिशय योग्य होती असेच मांडेल. भौतिक पातळीवरील प्रेमाला कमी दर्जाचे लेखून खरे प्रेम हे केवळ आत्मिक पातळीवरच असते असे सांगणाऱ्या त्या तरुणाने विचारलेल्या प्रश्नाचे त्या तत्ववेत्त्याने दिलेले उत्तर मला अजूनही आठवते

मानसशास्त्रावरील एका कार्यशाळेमधे प्रख्यात मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईड याच्या तत्वज्ञानावरील चर्चासत्रामधे एका तरुणाने जे. भास्कर या प्रख्यात विद्वानास असाच एक प्रश्न विचारला, प्रेमाच्या अनुभूतीत स्पर्शाचा सहभाग हा त्या अनुभूतीचा दर्जा कमी करतो का? या प्रश्नाचे जे. भास्कर यांनी दिलेले उत्तर जॉन डनने या कवितेत मांडलेल्या तर्काशी साधर्म्य ठेवणारे होते. जे. भास्कर म्हणाले होते, बेटा प्रेमाची अनुभूती ही शरीरांच्या माध्यमातूनच होते, ते प्रेम प्रेयसीचे प्रीयकरावरील असो किंवा आईचे मुलावरलहानग्या बाळाला आईच्या स्पर्शाची उब जशी आश्वस्त करते त्याच प्रमाणे तीच आई वयोवृद्ध झाली की तिचा हात तिच्या पोराने हातात धरुन त्यावर थोपटले की आईला आश्वस्त वाटते. स्पर्श हा प्रेमाच्या अनुभूतीमधील एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. स्पर्श ही भौतिक अवस्था मानून त्याला कमी लेखण्याचे कारण नाही. स्पर्शाने आपण बरेचवेळा अनेक बाबी शब्दांविना व्यक्त करीत असतो. प्रेमाचा स्पर्श आणि वासनेचा स्पर्श यात तफावत असते खऱ्या प्रेमाच्या जाणिवेतून केलेले स्पर्श ही मानवाची मुलभूत गरज असते. या मुलभूत गरजांच्या पूर्ततेतूनच प्रेमाचा आत्मिकतेकडील प्रवास सुरु राहतो हा प्रवास प्रेमाच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवरुन पुढे सरकत जातो. त्यामुळे प्रेमाची आत्मिक स्थिती ही आदर्श स्थिती असली तरी त्या स्थितीपर्यंत केला जाणारा प्रवास भौतिकतेच्या वेगवेगळ्या साक्षात्कारांच्या आधारे अद्भूतच असतो. जॉन डन म्हणाला त्या प्रमाणे एकमेकांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या आत्म्यांचा तो भौतिक साक्षात्कारच असतो..



No comments:

Post a Comment

Quote-Unquote@05.09.17 (Last Article)

   आधुनिक यंत्रजीवन                      “What shall I do now? What shall I do?” “I shall rush out as I am, and walk the street “With m...