Monday, 28 August 2017

Quote-Unquote@29.08.17

  सामाजिक काव्यहेतू                    

 Poetry; a criticism of life

 under the conditions fixed for such a criticism 

by the laws of poetic truth and poetic beauty.

-Matthew Arnold


इंग्रजी वाड़मयात मॅथ्यु अॅरनॉल्ड नावाच्या १९ व्या शतकातील कवीचे अनन्यसाधारण महत्व मानले जाते कारण इंग्रजी साहित्यातील रोमॅन्टीसिझमच्या कालखंडानंतर वास्तववादी काव्य निर्माण करण्याच्या प्रक्रीयेचा अॅरनॉल्ड हा प्रणेता होता. १९ व्या शतकामधे तत्कालीन ब्रीटीश समाजाने नव्या व्यवस्था स्विकारणे सुरु केले होते. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरावर प्रत्येकच घटक संक्रमणाची अवस्था अनुभवत होता. प्रत्येकाला बदल स्विकारणे जड जात होते त्यामुळे एक अस्वस्थतेची स्थिती निर्माण झाली होती. रोमँटीसीझममधे केवळ कल्पनारम्यता स्वप्नाळू सादरीकरणाने नटलेल्या कवितांचे जास्तीत जास्त लिखाण करण्यात आले. अर्थात ती त्या काळची गरज असल्याने त्याचे महत्व त्याच्या जागी आहेच. परंतू १९ व्या शतकातील बदलत्या सामाजिक परिपेक्षामधे स्वप्नवत कल्पनारम्यतेचे प्रयोजन फार नाही अश्या मतांना परखडपणे मांडून या कवीने कवींच्या कार्याची सामाजिक व्याप्ती वाढविण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले. आपल्या कवितांच्या विचार प्रक्रीये संदर्भातील मूलतत्व स्पष्ट करण्यासाठी अॅरनॉल्डने लिहीलेल्या दोन महत्वाच्या निबंधामधे हाच विषय प्रामुख्याने मांडण्यात आला. त्याची संकल्पना अशी होती की १९ व्या शतकाच्या सुरुवातीला कवींचे कार्य कल्पनासृष्टींची निर्मीती करुन वाचकांना आनंद देणे, मनाला दिलासा देणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून वाचकांना एका वेगळ्या जगामधे मानसिकदृष्ट्या प्रवेशित करावयास लावून त्यांच्या जीवनाच्या अडचणी विसरायला लावणे या निमित्ताने वाचकांच्या जीवनात स्वप्नवत रम्यता आणणे या प्रमुख हेतूंभोवती फिरत राहीले. परंतू १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात समाजव्यवस्था इतकी झपाट्याने बदलली की वाचकांना केवळ स्वप्नवत जगात रममाण करणे हे एवढेच कार्य कवींनी करणे अपेक्षित नव्हते. म्हणूनच अॅरनॉल्डने आपल्या निबंधातून वरील संकल्पना मांडली आहे. त्याच्यामते कवी हा कोणत्यातरी वेगळ्याच विश्वात रमणारा केवळ स्वप्नांच्या दुनीयेत वावरणारा व्यक्ती नाही तर तो या बदलत्या समाजाचा देखील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. अॅरनॉल्ड तर एक पाऊल पुढे जाऊन सामाजिक दृष्टी कवीचे स्थान किती श्रेष्ठ दर्जाचे आहे हे स्पष्ट करतो. तो म्हणतो, काव्यात्मक सत्यता आणि सौंदर्य यांच्या नियमाच्या चौकटीमधे कवींनी कवितेच्या माध्यमातून जिवनाबद्दलचे तर्कशुद्ध समिक्षण मांडावे. याचा अर्थ केवळ स्वप्नवादी निखळ आनंदनिर्मितीच्या पलीकडे जाऊन कवितेने सामाजिक आयाम देखील स्विकारावा ही काव्याला वेगळी उंची प्रदान करण्याचा प्रयत्न अॅरनॉल्डने त्याच्या निबंधातून मांडला होता. कवी हा समाजाचा महत्वाचा घटक असून सामाजिक व्यवस्थांचे सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण करण्याची क्षमता त्याच्यात मुळातच असते. या व्यवस्थांकडे विविध दृष्टीकोनातून बघणे सर्वसमावेशक विचारांच्या आधारे समाजोपयोगी विचार प्रसृत करणे ही फार मोठी जबाबदारी कवींना पार पाडायची आहे असे त्याचे म्हणणे होते. याच विचारांशी बांधिलकी ठेऊन इंग्रजी साहित्यात १९ व्या शतकाच्या उत्तरार्धानंतर काव्यनिर्मीती झालेली आपल्याला आढळते. सामाजिक दृष्टीने कवींचे मोठे योगदान तसेच त्यांच्या काव्यप्रतिभेतून निर्माण झालेला नवा सामाजिक दृष्टीकोन हे सारे विलक्षण आहे. साहित्य हे समाजनिर्मीतीच्या प्रक्रीयेमधील एक महत्वाचे साधन आहे या वाक्याची प्रचिती मॅथ्यु अॅरनॉल्ड याने सांगितलेल्या या संकल्पनेवरुन खऱ्या अर्थाने सिद्ध होते. हीच संकल्पना आज आपल्याही देशात राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे त्याकरीता सर्वसमावेशक विचार राबविणारे तसेच कोणताही पूर्वग्रह ठेवता काव्यप्रतिभेचा वापर करणारे कवी सध्या समाजाला हवे आहेत. परंतू यासाठी शिक्षित समाजाला मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत.

ज्याप्रमाणे इंग्लंडमधे १९ व्या शतकात सर्वच क्षेत्रामधे संक्रमणावस्था निर्माण झाली तशीच काहीशी सध्या आपण आपल्या देशात अनुभवतो आहे. २१ व्या शतकात तंत्रज्ञानाच्या वेगामधे आपले अवघे जीवनमानच ढवळून निघते आहे. आपल्या श्रद्धांना देखील दिवसांगणिक तडे जात आहेत, नव्या व्यवस्था उभ्या राहू बघताहेत. आपल्या देशाच्या वैविध्यपूर्णतेमधील एकता देखील कुठेतरी विस्कळीत झाल्यागत वाटते आहे. खरे तर २१ व्या शतकामधे आपल्या देशात विविध बाबतीत असलेली वैविध्यता एकरुपतेमधे परावर्तित होऊन आपला देश एकसंध होईल अशी आशा अनेकांना वाटत असताना अचानक या विविधता घट्ट चौकटींचे रुप घेऊन बंदिस्तता निर्माण करताहेत की काय अशी शंका निर्माण होते आहे. २१ व्या शतकामधे कदाचित आपला देश जगाचे नेतृत्व करेल अश्या आशा आपल्या मनात पल्लवित झाल्या असतानाच वेगवेगळे समुदाय एकमेकांची उणीदुणी काढून अक्षरशः खुलेआम हिंसेची भाषा बोलू लागलेत. कधी नव्हे इतके जातीपातींचे संदर्भ जाहीरपणे देऊन त्या आधारावरील वेगळेपण ठसठशीतपणे जाणवून देण्याचा प्रयत्न केला जातोय. या सर्व बदलत्या वातावरणात ज्यांनी तटस्थ राहून सर्वसमावेशक एकरुपतेचा विचार समाजासमोर मांडण्याची गरज आहे ते उच्च प्रतिभेचे धनी असलेली कवी मंडळी देखील या विविध गटांचा भाग होऊन आपली काव्यप्रतिभा तेढ निर्माण करण्यासाठी वापरताना दिसतात ही खरी दुर्दैवाची बाब आहे. सध्याच्या आपल्या देशातील संक्रमणावस्थेमधे काव्यप्रतिभा असलेल्या सर्व महानुभावांनी एकत्रीतपणे तटस्थ राहून मॅथ्यू अॅरनॉल्ड म्हणतो त्या प्रमाणे आपल्या आसपासच्या जीवनाचे वैचारिक पृथक्करण करुन आपल्या काव्यातून समाजाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

साहित्य क्षेत्रामधे ज्यांना नेहेमीच मानाचे स्थान प्राप्त होते अश्या कवींना सध्याच्या काळात एक मोठी जबाबदारी एकत्रीतपणे पार पाडता येऊ शकते. इतर कोणत्याही साहित्यप्रकारापेक्षा काव्यनिर्मीती हा एक विशेष प्रकार नेहेमीच मानल्या गेला कारण यमकजोडणी करणाऱ्या कवींचा अपवाद सोडल्यास प्रभावी काव्यनिर्मीतीसाठी काव्यप्रतिभा ही मुळातच असावी लागते. निबंध किंवा लेख याबाबतीत काही प्रमाणात सरावाने प्रभुत्व येऊ शकते परंतू काव्यनिर्मीती ही मात्र काही मोजक्या प्रतिभावंतांचाच प्रांत आहे. अर्थात या वैशिष्ट्यामुळे त्यांना प्रतिसाद देखील तसाच इतर साहित्य प्रकारापेक्षा विशेषच लाभतो. या श्रेष्ठत्वाचा उपयोग आता समाजात चांगले सकारात्मक विचार प्रसृत करण्यासाठी व्हावा ही काळाची गरज आहे. कवींचे समुहचिंतन व्हावे अश्या व्यवस्था देखील निर्माण कराव्या. अन्यथा कवी म्हणजे एकटा, आपल्याच धुंदीत राहणारा, आपल्याच स्वप्नविश्वात रमणारा अशी प्रतिमा आता बदलून समाजात वावरणारा, समाजाचे तटस्थ तार्किकतेने निरीक्षण करणारा या सर्व समाजिक संक्रमणाच्या काळात प्रभावी जीवन जगण्याचे सकारात्मक उपाय पूर्वग्रह बाळगता निर्भिडपणे मांडणारा अशी प्रतिमा निर्माण होण्याची गरज आहे. या सर्व विचाराशी विशेषत्वाने तरुण पिढीला जोडण्याची गरज आहे. कारण तंत्रज्ञानाच्या भस्मासुरामुळे अभिजात साहित्य आणि त्याहूनही अभिजात काव्य यापासून ही तरुण पिढी कोसो दूर आहे. एखादी मनाला भिडणारी कविता फेसबुकवरील लाईकपुरती मर्यादित बनली आहे. त्यामुळे त्याचा परीणाम जीवनावर होणे ही बाब फार दुरापास्त बनली आहे. अश्या काळात कविता जगविणे, तिचा प्रचार प्रसार करणे आणि त्या माध्यमातून जगण्याच्या सकारात्मक दिशा प्रदान करणे ही मोठी परंतू अत्यंत महत्वाची जबाबदारी समस्त प्रतिभाशाली कवींची कवितांवर मनापासून प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या अनेकांची आहे. ही जबाबदारी आपण एकत्रीतपणे निभावल्यासच काव्य टीकेल आणि ते टिकले तरच समाज घडेल.



No comments:

Post a Comment

Quote-Unquote@05.09.17 (Last Article)

   आधुनिक यंत्रजीवन                      “What shall I do now? What shall I do?” “I shall rush out as I am, and walk the street “With m...